Saturday, December 22, 2018

लोकशाहीला नाही वर्ज्य

कुणी म्हणाले दलित
भटक्या कुणी म्हणाले
हाडाचा कुणबी तो
ठणकावून सांगितले

बिनकाम रित्या डोक्यांना
विषय चघळाया नवा
खडा तुरट जातीचा
बेशर्म जिभांना हवा

स्वये श्रीरामप्रभू मातले
जनचर्चा त्या बाधली
जनसामान्य इथे तर सारे
नेत्यांच्या आधीच हवाली

देवळाबाहेरच्या रांगेतला
एकेक मोजला जाईल
हक्काचा मतदार, त्याची
जात पडताळणी होईल

लोकशाहीला नाही वर्ज्य
कुणीही माणूस वा देव
तुझ्यावरच आले आता
मारूतीराया, तुझी जात समोर ठेव

- संदीप चांदणे (२२/१२/२०१८)

Monday, June 11, 2018

बांडगूळं

बांडगूळं


बांडगूळं आधीही दिसायची…
पण, ती रानात.
राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर…
....जुन्या खोडांवर.
आता मात्र ती दिसतात
अगदी कुठेही…
म्हणजे...
रोपांवर वगैरे.
इथपर चाललं असतं
पण आता ती
यायला लागलीत
तणांवर..
माजलेल्या…
…विचारांच्या तणांवर!

संदीप चांदणे (११/६/२०१८)



Tuesday, April 17, 2018

सगळीकडे सारखेच

सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला
मैदानावर जमल्यावरच्या गप्पा

ते यूपी बिहारवाले लै भुरटे
विश्वास न ठेवण्याच्या लायकीचे

दिल्ली हरयाणावाले तर आगाव
एकजात सगळे माजोरडे साले

गुजराती मारवाडी तर काय
लुटायलाच बसलेत सारे

चांगले वाटतात बाहेरून पण हे
मल्लू मद्राशी पक्के आतल्या गाठीचे

आसामी बंगाली पण त्यातलेच
गोड बोलून गंडा बांधणारे

दुपारी जेवल्यानंतर टपरीवर जमलो
चहा बिडीकाडी करत बोलू लागलो

धुळे जळगाव खानदेशवाले अमुक
हे नागपूर विदर्भवाले तमुक

सांगली सोलापूरवाले साले दुष्काळी
आडमुठे अर्धवट नाशिक नगरी

सातारा कोल्हापूरवाले पण त्यातलेच
आणि कोकणी एक नंबर चिक्कू

बीड उस्मानाबादी तर मजाच
गडचिरोली चंद्रपूरवाले नक्सली

अहो, बाकी परवडले पण हे
पुन्यामुंबइकडले अतिशहाणेच

रात्री जेवल्यानंतर घराबाहेर पडलो
सोसायटीतल्या बेंचवर येऊन बसलो

हे एक्स बिल्डींगवाले काय समजतात स्वतःला
त्या वाय बिल्डींगवाल्यांची तर लायकी आहे का?

त्या पलिकडच्या सोसायटीत रोज नवी प्रकरणे असतात
आमदाराचा मेव्हणा राहतो म्हणून या सोसायटीचा माज

त्या अमक्या सोसायटीची झोपडपट्टी झालीये
आणि हे मोक्याची जागा मिळवून बसलेत साले

डि मार्ट ह्यांच्या समोर उभा राहतंय म्हणजे
साला आता भाव येणार ह्यांच्या फ्लॅटला

ह्यांच्याकडेच कसा आधी रस्ता, ड्रेनेजलाईन?
आम्ही काय रूमाल टाकून जागा धरल्यात का?

मित्रांना व्हाट्सअप वर सांगितलं एकदाचं
बाहेरच्या देशातून ऑफर आलीये जॉबची

कुठेही जा पण मिडल ईस्टला आजिबात जाऊ नको
ऑस्ट्रेलियात सगळ्यात जास्त मारतात आपल्याला

न्यूझीलंडमध्ये तर शेजारी उभे पण राहत नाहीत
आफ्रिकन देशात किडनीच काय हार्टही घेतात

युरोप जर्मनी पण आधीसारखं सेफ राहिलं नाही
अमेरिकेत तर कधी कुठे गोळी लागेल माहित नाही

इंडोनेशिया थायलंडमध्ये काहीही खातात
सौदी, कतार वगैरे लै डेंजर बाबा, नकोच!

रशिया, आईसलँड तुझ तूच ठरव
गारठून मरायच का कसं करायचं?

रात्री झोपताना खाटावर विचार आला
एवढीच तर जागा पाहिजे आपल्याला!

- संदीप चांदणे (१७/४/१८)

Wednesday, March 28, 2018

घायाळ वेचलेल्या फुलांनी

झेलले भाले आणिक तीरही किती सरसावूनी
घायाळ परि आज झालो तू वेचलेल्या फुलांनी

ते माळलेले फूल मज नाही पाहवले
उभे ठाकने प्रितसमरी नाही साहवले
जाणिले व्यर्थ सायास माझे तुला स्वप्नी पाहूनी

गहजब तुज नसावे ठाऊक इशाऱ्याचे
घाव देती काळजात दुखऱ्या चिऱ्याचे
जातील सोडून जगा मजसम वेडे वेड लागुनी

तू कशी आळवली विरहगाणी सुरांत
मी फक्त कोंडल्या साऱ्या चाली उरांत
साजरी व्हावी रात साजिरी कुठल्या तराण्यांनी?

- संदीप चांदणे (२८/३/२०१८)

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...