Tuesday, April 17, 2018

सगळीकडे सारखेच

सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला
मैदानावर जमल्यावरच्या गप्पा

ते यूपी बिहारवाले लै भुरटे
विश्वास न ठेवण्याच्या लायकीचे

दिल्ली हरयाणावाले तर आगाव
एकजात सगळे माजोरडे साले

गुजराती मारवाडी तर काय
लुटायलाच बसलेत सारे

चांगले वाटतात बाहेरून पण हे
मल्लू मद्राशी पक्के आतल्या गाठीचे

आसामी बंगाली पण त्यातलेच
गोड बोलून गंडा बांधणारे

दुपारी जेवल्यानंतर टपरीवर जमलो
चहा बिडीकाडी करत बोलू लागलो

धुळे जळगाव खानदेशवाले अमुक
हे नागपूर विदर्भवाले तमुक

सांगली सोलापूरवाले साले दुष्काळी
आडमुठे अर्धवट नाशिक नगरी

सातारा कोल्हापूरवाले पण त्यातलेच
आणि कोकणी एक नंबर चिक्कू

बीड उस्मानाबादी तर मजाच
गडचिरोली चंद्रपूरवाले नक्सली

अहो, बाकी परवडले पण हे
पुन्यामुंबइकडले अतिशहाणेच

रात्री जेवल्यानंतर घराबाहेर पडलो
सोसायटीतल्या बेंचवर येऊन बसलो

हे एक्स बिल्डींगवाले काय समजतात स्वतःला
त्या वाय बिल्डींगवाल्यांची तर लायकी आहे का?

त्या पलिकडच्या सोसायटीत रोज नवी प्रकरणे असतात
आमदाराचा मेव्हणा राहतो म्हणून या सोसायटीचा माज

त्या अमक्या सोसायटीची झोपडपट्टी झालीये
आणि हे मोक्याची जागा मिळवून बसलेत साले

डि मार्ट ह्यांच्या समोर उभा राहतंय म्हणजे
साला आता भाव येणार ह्यांच्या फ्लॅटला

ह्यांच्याकडेच कसा आधी रस्ता, ड्रेनेजलाईन?
आम्ही काय रूमाल टाकून जागा धरल्यात का?

मित्रांना व्हाट्सअप वर सांगितलं एकदाचं
बाहेरच्या देशातून ऑफर आलीये जॉबची

कुठेही जा पण मिडल ईस्टला आजिबात जाऊ नको
ऑस्ट्रेलियात सगळ्यात जास्त मारतात आपल्याला

न्यूझीलंडमध्ये तर शेजारी उभे पण राहत नाहीत
आफ्रिकन देशात किडनीच काय हार्टही घेतात

युरोप जर्मनी पण आधीसारखं सेफ राहिलं नाही
अमेरिकेत तर कधी कुठे गोळी लागेल माहित नाही

इंडोनेशिया थायलंडमध्ये काहीही खातात
सौदी, कतार वगैरे लै डेंजर बाबा, नकोच!

रशिया, आईसलँड तुझ तूच ठरव
गारठून मरायच का कसं करायचं?

रात्री झोपताना खाटावर विचार आला
एवढीच तर जागा पाहिजे आपल्याला!

- संदीप चांदणे (१७/४/१८)

No comments:

Post a Comment

खुदा ही बन जाते

एक खयाल यूं हैं, अगर बन पाते तो खुदा ही बन जाते काफीर हूं इसीलिए दुवामें हाथ नहीं उठाये जाते  - संदीप भानुदास चांदणे (गुरूवार , १७/१०/२०२४)