कुणी समोरून हसलं
की खेकसलं पाहिजे
चुकून बोलेल त्याला
धरून भोकसलं पाहिजे
कशाला कुणाशी
नीट वागत बसा
मरणाचे कष्ट घ्या
गाली हळू हसा
नजरेनेच जागेवर
एकेकाला शेकवलं पाहिजे
चालून येईल तुमच्याकडे
कुणी कमनीय तरुणी
लाडे लाडे बोलेल
ओठांचा चंबू करूनि
झिडकारून तिचं प्रेम
तिला हिणवलं पाहिजे
सगेसोयरे आणि
शेजारीपाजारी
यांचं जीवन म्हणजे
निव्वळ उसणवारी
गप्प राहून खुणेनेच
ह्यांना हाकललं पाहिजे
जो तो टपला आहे
आपल्या स्वार्थासाठी
मामा आणि आज्जीची
ती म्हण नाही खोटी
वेळीच ओळखून ह्यांना
आयुष्यातून काढलं पाहिजे
खरं खोटं कळेना
सगळं कृत्रिम झालंय
नसलेल्या व्याधींसाठीही
बाजारात औषध आलंय
बाजारात जे नाही ते
मिळवण्यासाठी झटलं पाहिजे
आयुष्य जगायचं का काढायचं
विचार करून ठरवलं पाहिजे
कुणाच्या तरी उरातली ऊब घेऊन
आपणही तसंच पेटलं पाहिजे
- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, १०/१०/२०२४)
No comments:
Post a Comment