Thursday, October 10, 2024

कळकट स्वत्वाची कांडी

निराशेचा काळा काळोख 
तमात खेळ फसवा मांडी
द्या काळाच्या कसवटीला
कळकट स्वत्वाची कांडी

घासून जाऊद्या बोथट जिणे
ठिणग्यांचा वर्षाव दिसू दे
तमभरल्या जगण्यात तुमच्या 
लख्ख लकाकी झळकून उठू दे 

पळभराचे अशाश्वत आयुष्य 
पळभराला किती कवळाल? 
चिंतेच्या गहिऱ्या डोहात 
पाय सोडून किती बसाल?

एकेक मजल गाठीत
यशशिखराला लावा शिडी
द्या काळाच्या कसवटीला
नवी, बळकट स्वत्वाची कांडी

- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, १०/१०/२०२४)

No comments:

Post a Comment

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...