Friday, January 25, 2013

डोळे

एवढे ग कसे तुझे
पाणीदार डोळे?
करतात खोड्या
आणि दिसतात भोळे!

वाटेवर परवा माझ्या
झाले होते ओले
जवळ तुला घेताच
दार लावून गेले!

इशारे सारे
शिकून आलेत कुठून?
काही न बोलताच
सारे जातात सांगून!

पापण्याही डोळ्यांच्या
खेळांमध्ये सामील
किती घायाळ होती
माझ्यासारखे गाफील

ओठांनी आता
बोलू नये वाटते
एवढी तुझ्या डोळ्यांची
भाषा मला कळते!

माझ्या बाळाची आई

घालीन जिच्या मी ओटी
माणिक-मोती कित्येक कोटी
दुसरी कुणीही नाही
ती, माझ्या बाळाची आई

स्मरू त्या घडीस सदा
दिली जिने ही चाहूल
आम्ही जाऊ स्वप्नांच्या गावा
जिथे चालेल बोबडे पाऊल
रास होईल सुखांची
आणि सागर आनंदाचा
वात्सल्यमूर्ती होई
माझ्या बाळाची आई

गोकूळ घराचे होईल
बाळ नंदाचा येईल
पडता कानी स्वर पहिला
हर्ष आम्हांस होईल
पिल्लू आम्हां पाखरांचे
पाडस होईल हरणाचे
अन वासराची गोमाई
माझ्या बाळाची आई

मग धावू आम्ही दोघे
चिमण्या बाळाच्या पाठी
लडिवाळ-मंजुळ हाका
असतील आमुच्या ओठी
थकून ते जेव्हा
कुशीत विसावून जाईल
गाईन प्रेमळ अंगाई
माझ्या बाळाची आई

Thursday, January 24, 2013

एक उदास संध्याकाळ

कुठली अनामिक ओढ ही
रेंगाळणाऱ्या सांजेला
दूर क्षितीजी पिवळी गुणगुण
हुरहुर लावी मनाला

शहारत्या पाठी कुरणांच्या
तिरप्या नजरा रविकिरणांच्या
शब्द न पुरवी गीताला
तळ्यातल्या रांगा बदकांच्या

दुर्लक्षित थवे पक्ष्यांचे
अन किणकिण घंटा गायींच्या
उलगडता न उलगडणाऱ्या
घड्या हाता-पायांच्या

माळावरची जलद सावली
नकळे भरभर कुठे चालली
अकस्मात ही निसर्गचित्रे
पापण्यांच्या कडांत बुडाली

Wednesday, January 23, 2013

प्राजक्तफुला

तिचे तिमिरी केस लहरता
चहु दरवळ अत्तराचा
तिला लपविण्या मदती माझ्या
सडा प्राजक्तफुलांचा

फुले वेचुनी परड्या भरता
नाजूक तिच्या बोटांनी
अगणित ती सुवासिक स्मरणे
मी, भरू कुठल्या कुप्यांनी?

भेट एकांती सजविण्या
ये पुन्हा-पुन्हा बहरूनी 
धवल-केशरी गालीचा तू
ठेव तिथे पसरूनी

तव गंधासवे कवितांचा
माझ्या, व्हावा स्वैर झुला
दे एवढाच मजला सुगंध
तू, उसणा प्राजक्तफुला

- संदीप चांदणे (९/११/२०१२)

Friday, January 4, 2013

एक तळे

एक तळे
निळे निळे
माशांना साऱ्या
घेऊन लोळे

दाट झाडी
गर्दी झुडूपांची
पाऊलवाट
गावाबाहेरची
तळ्याकडेच
मुरडत वळे

कोळ्याची होडी
वल्हे होडीचे
बगळ्याची समाधी
सूर बदकांचे
खेकड्यांची बिळे
इथेच मिळे

सकाळी झळाळे
शहारे सांजेला
नक्षी तरंगाच्या
मिळती काठाला
दिवसभर खुळे
स्वतःशीच खेळे
एक तळे
निळे निळे

- संदीप भानुदास चांदणे

एकांत

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?

चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना
बळेच एकत्र मांडावं
नेमकं त्याच कडव्यावर
का मनानं सांडावं?

आजच्या बंडखोर लेखकानं
कालच्याला भांडावं!
दोघांचही चुकत नसतं
कुणाला समोर ठेवावं?

तिन्हीसांजेची वेळ समोर
अन एकांतानं घेरावं
कितीही नको म्हटलं तरी
का आठवणींनी आठवावं?

शीळ  येते मुक्कामी
शब्दांनी का रुसावं?
सुस्कारे नि हुंकार याला
गुणगुणनं कसं म्हणावं

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?

स्वच्छंदी

डोळ्यात तू, श्वासांत तू
गंध तुझाच सुगंधी

बाहूत तू, मनात तू
चेहरा तुझाच धुंदी

शब्दांत तू, गीतात तू
तुझाच मी छंदी

अबोल मी, अजाण मी
पाखरापरी तू स्वच्छंदी

Thursday, January 3, 2013

फुलाचे मनोगत

फूल झालेल्या कळीस एका
विचारले मी नवलाईने
किंचित लाजून, थोडी हसून
बोलली ती मग धिटाईने

पुसले त्या सुकुमार पुष्पा
फुलले कसे सुगंधी यौवन?
जादू घडली रात्रीत कशी,
कुणी घातले तुज संमोहन?

सांगे मज ती कळी कालची
वाऱ्यावरती कितीक डोलून
भ्रमर, प्रियकर, फुलांचा येईल
गेल्या वातलहरी कानी सांगून

ताटव्यातल्या फुलांपरी मी
मधमाशांसवे जाईन रमून
मागून घेईन गुणगुण गाणी
आणि मधुरस देईन वाटून

स्त्रीच्या शृंगारसाधने दिली
जरी सौभाग्यलेणी ठरवून
मीही सजवीन वेणी होऊन
तयां केशीचे रूप अजून

रे खराखुरा मी होईन धन्य
दे पायदळी मज तू त्यांच्या
कष्टी कुणा भवताली पाहून
ढवळून उरात येई ज्यांच्या

- संदीप भानुदास चांदणे 

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...