Wednesday, December 25, 2019

येतेस घरी तू जेव्हा

"नसतेस घरी तू जेव्हा" ह्या कवितेवरील हे विडंबन मराठीतील सुप्रसिद्ध कवी श्री संदीप खरे यांची माफी मागून रसिकांना अर्पण!


येतेस घरी तू जेव्हा
जीव कावरा-बावरा होतो
'बसण्याचे' होती वांधे
सगळा प्लॅनच चौपट होतो!

बेल वाजता वीज पडावी
शॉक तसा तो बसतो
कुठे पळू-लपू असे होते
कसेबसे ग्लास ते लपवतो!

जातात मित्र दाराशी
हिरमुसून बघती मागे
डोळ्यांनीच निरोप देऊन
मी स्फुंदून आतच रडतो!

तव बेडाखाली असलेल्या
मज स्मरती ग त्या बाटल्या
धस्सकन मग हार्टात होते
मी मटकन खाली बसतो!

तू सांग सखे मज कसे
सांगू मित्रांना या फुटाया
मित्रांचा जीव उदास
माझ्यासह तिळतिळ तुटतो!

ना अजून प्यालो होतो
ना भरलेले ग मी ग्लास
तुझ्यामुळे ही गत होते
माझा ड्राय डे घडतो!

- संदीप चांदणे (१०/३/२०१६)

दुप्पट खाशी

मिरची घालून अगदी ताजी
बटाट्याची खमंग भाजी
तळण कुरकुरीत तळलेले
रताळे एखादे उकडलेले
लाडू गोड राजगिऱ्याचे
पाकिट उपास चिवड्याचे
शाबूचा वडा अन् खिचडी
भगर आणि दाण्याची आमटी
नंतर शहाळे गारगार प्या
खजूरही जरा खाऊन घ्या
गूळ शेंगदाणे अधूनमधून
केळी चार-सहा मस्त सोलून
उपास आहे कडक तुमचा
बाकी फळांचाही पाडा फडशा 

- संदीप चांदणे (गुरूवार, १७/८/२०१७)

Friday, December 20, 2019

नजर

नजर नजरेला मिळेना
तिच्या मनातले कळेना...||धृ||

लहरी वाऱ्यावर लहरे
आवरेना स्वतःला
कसे सावरावे कुणी
घोर इथे या जीवाला
घोर इथे या जीवाला
तिच्या पदराला कळेना...||१||


रेखीव, वळणदार, नाजूक
घोटीव, जीवघेणे झाले
रंगलो अंतरंगी पुरता
काळीज बरबटून गेले
काळीज बरबटून गेले
तिच्या काजळास कळेना...||२||


हरवली मखमालीची
चाहूल तिची मोरपिशी
वणवणता दिन गेला
रात्र ही जाईल कशी?
चित्त कानी साकळले
चित्त कानी साकळले
तिच्या पैंजणास कळेना...||३||

- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)

एक पैंजणाचा पाय

रूणझुणती चांदणी
गुणगुणती पहाट
पुरवेच्या आभाळास
आता सुर्व्याचीच वाट

निज सोडून चालली
रात घाबरीघुबरी
वळूनिया पाही मागे
जाग आली दारोदारी

जणू सूर सतारीचे
घुमती चारीठाय
पडे अंगणी सड्याच्या
एक पैंजणाचा पाय

- संदीप चांदणे (मंगळवार, १२/०२/१९)

ह्या असल्या पाऊसरात्री

ह्या असल्या पाऊसरात्री
मी नीज लोटूनी देतो
आठवांच्या मऊ उशीला
हलकेच कुशीत घेतो

रात्र कशी सरावी?
या अवघड प्रश्नामध्ये
नाव कागदी सोडून
हेलकावे बघत बसतो

प्रौढ जलधारांच्या
सुरात चालती गप्पा
मी त्यांच्या मैफिलीला
पहिल्या रांगेत बसतो

किती नाही म्हणावे
मी हळवा उगाच होतो
तुझे गाणे तुझ्यासाठी
माझ्याही नकळत गुणगुणतो

- संदीप चांदणे (शुक्रवार, २/८/१९)

तिची ओलेती केसं

तिच्या ओलेत्या केसांनो
माझं धडधडे काळीज
मन भुलूनिया गेलं
भल्या सकाळीच आज

नका करू शिडकावा
गार थेंबाचा निथळून
माझ्या अंगातून सारं 
अवसान गेलया गळून

कसं लावू लक्ष आता
दिवसभर मी कामात
बिन मोगऱ्याची वेणी
माझ्या गंधाळली मनात

सावरून बटा साऱ्या 
दिसतील छान खूप
पण मनी झिरपले
त्यांचे ओलेते स्वरूप


- संदीप चांदणे (२०/१२/२०१९ - २३/०५/२०२४)

प्रेम नव्हे

ते प्रेम नव्हे

येई अनुभवाते मिटून लोचनाते
पारखून घ्यावे ते प्रेम नव्हे!

मुकी साद देऊन, अंतरी डोकावते
पाहून तोंड फिरवावे ते प्रेम नव्हे!

फुलविते जिणे, कुणाचे असणे
खोटे हसू दाखवावे ते प्रेम नव्हे!

मुक्त उधळावे, रिते रिते व्हावे
रडून भांडून घ्यावे ते प्रेम नव्हे!

- संदीप भानुदास चांदणे (२०/१२/२०१९)

Saturday, February 2, 2019

हा संभ्रम माझा

नकळत ओढून नेतो
मिचकावत सोडून देतो
स्वतःशीच खिन्न हसतो
हा संभ्रम माझा

स्वप्नांच्या झुळूकी मनाला
तप्त पाऊलवाटा पायाला
अनवाणी चालू पाहतो
हा संभ्रम माझा

अवखळ विचारांच्या वाऱ्यात
दात-ओठांच्या माऱ्यात
क्षणासाठी मलम होतो
हा संभ्रम माझा

- संदीप चांदणे (शनिवार, २/२/२०१९)

चाप ढिल्ले होईस्तोवर

येडे चाळे करणाऱ्यांना
हानतो आम्ही सुजस्तोवर
मित्रांना मात्र हसवतो
चाप ढिल्ले होईस्तोवर

घरचं-दारचं, बायकोचं
टेन्शन कामाचं, ऑफिसचं
विसरायला लावतो हसवून
चाप ढिल्ले होईस्तोवर

पैसा पैसा किती करणार
एकटे एकटे किती झुरणार
या हसा आमच्यासोबत
चाप ढिल्ले होईस्तोवर

- संदीप चांदणे (शनिवार, २/२/२०१९)

Tuesday, January 29, 2019

एक चांदणी माझ्या घरात डोकावते

दुधाळ चांदव्यात, प्रखर तेजाळते
एक चांदणी माझ्या, घरात डोकावते

मी बसतो दडून, तिच्यापासून
ती हलत नाही, टक लावते

माझा मी लिहितो, हळुवार गुणगुणतो
ही, मी लिहिलेले, गावाला ऐकवते

चालत राहते रात्र, ही चांदणी मात्र
अमीट असल्याच्या, थाटात वावरते

उशीरा कधीतरी, फिरते माघारी
ती गेल्यावर तिची, टिमटिम आठवते

रात्रभर छळते, मला जागवते
पहाटे निमूट माझ्या, कवितेत उतरते

- संदीप चांदणे (बुधवार, ३०/०१/२०१९)

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...