Tuesday, May 19, 2020

मरणंच अटळ असेल तर

मरणंच अटळ असेल तर,
आपल्या गावाकडं जाऊन मरूया...
असं म्हणत
जरूरीपुरती आणि झेपतील एवढी बोचकी घेतली
डोक्यावर, कंबरेवर, पाठीवर
त्याचं ओझं शरीराला लागत नव्हतं
मनाला भार जाणवत होता
तरीही लागले चालायला
इथल्या मरणापासून लांब
तिकडच्या जीवनाच्या शोधात..
त्याच्याच शोधात तर आधी
शहरात आले होते ते सारे
उधार्‍या, उसनंपासनं करून,
काहीबाही गहाण ठेऊन
हातातले हात सोडवून
पुढचं पुढं बघू असं म्हणत...
ओळखीच्याचा हात धरून आलेले
सुरूवातीला काहीच कळत नव्हतं, काय चाललंय
एकेक दिवस एकेक गोष्ट शिकवत होता
शहरात रूजवत होता
शिकले, रूजले,
आताशा कुठे जगायला लागले होते
काडी काडी करून एक
ओबडधोबड घरटे विणलेले
आता पुन्हा त्याच्या काड्या झालेल्या
पण या क्षणी परत गावाला जाताना प्रश्न होताच...
इथून मुळासकट उपटलेल्या आपल्या आयुष्याची रोपटी
पुन्हा गावाकडे जगतील? का जातील जळून?
शहराने शिकवलंच की!
गावही घेईल सांभाळून
आपल्या वाडवडिलांचं आहे ते
आई, मामा, मावशी, आत्या, काकांच
सारे तर तिथेच आहेत
काही जमिनिच्या वर
काही जमिनिच्या खाली
असा विचार करत...
एकेक पाऊल उचललं जात होतं
मरणंच अटळ असेल तर,
आपल्या गावाकडं जाऊन मरूया...
असं म्हणत!

- संदीप भानुदास चांदणे (१९/०५/२०२०)

No comments:

Post a Comment

खुदा ही बन जाते

एक खयाल यूं हैं, अगर बन पाते तो खुदा ही बन जाते काफीर हूं इसीलिए दुवामें हाथ नहीं उठाये जाते  - संदीप भानुदास चांदणे (गुरूवार , १७/१०/२०२४)