Tuesday, December 27, 2016

सांजक्षितीज

झाडामागे लपलेला
सूर्य शोधताना
दिसले सांजक्षितीज
लालभडक, जळताना!

विश्रांतीवेळ जराशी
पायपीट उद्या उराशी
जाणवले हे पायांना
थकून तिथे बसताना!

अजून आहे चालायचे
मैल काही कापायचे
कळते जिवंत असल्याचे
मनाशी हे घोकताना!

- संदीप चांदणे (रविवार, १/१/२०१७)

Wednesday, December 14, 2016

मुळांनी धरू नये अबोला

मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये
त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात

आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये
जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात

घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये
मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात

जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये
वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात

इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये
उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे?

- संदीप चांदणे (बुधवार, १४ डिसेंबर २०१६)

Tuesday, November 29, 2016

कंट्रोल रूम - २

(जुनाच ढिस्क्लेमर: या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!)
०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
"नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?"
"हॅलो, म्याडम, ते याडं टाकीवं चलडय... उडी माराय."
"पत्ता सांगा, कुठून बोलताय तुम्ही"
"प...त्ता... हां लिहून घ्या ॲड्रेस... जनबाई गिरमे चाळ, मोडक आळी, मेन बाजाराच्या म्हाग.. खेड."
"थोडक्यात सांगा, आत्ता काय परिस्थिती आहे, कोण चढलंय टाकीवर? कसली टाकी आहे? किती लोक आहेत तिथे?"
"आवो काय सांगाह्याचं... आत्ता आलतो दुकान उघडाह्या. तं सकाळ सकाळ मोप गर्दी! पाह्यलं तं ते पलीकल्ल्या गल्लीतलं ब्यावडं जगताप चलडय टाकीव आन लागलय जोरजोरानी बोंबा ठोकाया! ती टाकीबी यागळीच ह्ये, मोठया टाकीवं बारकी टाकी हाये. कोन सलापवं जरी चलडा तरी त्ये उडी टाकीन म्हणतयं. कोन्ला येऊं द्येना झालयं वर. निस्त आराडतय, शिव्या देतयं बायकूला आन उडीचं टाकतो म्हणतयं! बगा लवकं काह्यतरी करा नाह्यतं ते मारातय उडी आजं!"
"ओके, लगेचंच पोलीस आणि फायरब्रिगेड वाले येतील तिथे."
अशा एका कॉलने कंट्रोल रूमच्या आजच्याही दिवसाची सुरूवात झालेली आहे. कॉल ड्युटीवर असलेल्या म्याडम पो.शि. सौं. स्वाती चाबळे मॅडम यांनी यांत्रिकपणे पहिला फोन फायब्रिगेडला लावला व दुसरा त्या भागातील सरकारी दवाखान्यात लावला आणि शेवटचा पोलीस स्टेशनला.
"एएसाय मानमोडे बोलतो."
"तुमच्या भागातून कॉल आलेला आहे. बाजाराच्या मागच्या आळीत एक माणूस आत्महत्येसाठी टाकीवर चढलेला आहे. पॉईंटवर लवकरात लवकर पोलीस पथक व मार्शल्स पाठवा."
"म्याडम, रात्रपाळीचे लोकं आता ड्युटी संपवून घरी निघालेत व दिवसपाळीचे आत्ता हाजरीला थांबलेत म्याडम. दहा मिन्ट तरी लागतेल पॉईंटवर पोचायला."
"ओके, शक्य तितक्या लवकर पॉईंटवरून रिपोर्ट करायला सांगा."
टाकीवरच्या विरूला उतरवण्यासाठी फायब्रिगेडची गाडी कशीबशी त्या गल्लीत शिरून त्या उमारतीला दोन बाजूंनी शिड्या लावण्यात यशस्वी झाली होती. मार्शलही तोपर्यंत आलेच, त्यांनी दोन-चार शिव्या हासडत, एकदोघांच्या बखोटीला धरून भिरकावून देत गर्दी पांगवली. फायब्रिगेड, पोलीस बघताच टाकीवरच्याची तंतरली. वरच्या लहान-गोलाकार टाकीवर त्याच्या हालचाली जलद होऊ लागल्या व कोणीही वर आल्यास उडी मारेन अशी धमकी देऊ लागला.
फायब्रिगेडचे कर्मचारी त्याला न जुमानता झपाट्याने शिडीवरून वर चढू लागले तशी त्याने एकदाची उडी मारलीच! गर्दीच्या काळजाचा ठोका चुकला. हातातले मोबाईल बाजूला करून पब्लिक आपापल्या डोळ्यांनी त्याला वर शोधू लागलं. उडी मारणारा खालच्या टाकीची साईज विसरला होता व पॅनिक होऊन विहिरीच्या काठावरून पाण्यात उडी मारतात तशी उडी मारून बसला होता. आता तो खालच्या टाकीच्या कडेलाच मोडलेला पाय हातात घेऊन पालथा पडून जोरजोरात बोंबलत होता. एव्हाना फायरब्रिगेडचे कर्मचारी त्याच्याजवळ पोचलेच होते. त्यांनी त्याला त्यांच्याजवळच्या दोऱ्यांत अडकवून खाली सुखरूप उतरवला. स्ट्रेचर घेऊन ॲम्ब्युलन्सचे लोकंही हजर होतेच. तात्काळ त्याला ॲम्ब्युलन्सात चढवला. तिथे एका हवालदाराने त्याचा जबाब घेतल्यावर आधीतर पब्लिकला हसू आवरले नाही आणि नंतर वैताग व त्रागा. त्याने जबाबात आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण बायको जेवायला देत नसल्याचे सांगितले!!

पुढचा कॉलही रांगेत होताच.

"नमस्कार, कंट्रोल रूम. बोला, काय मदत हवी आहे."
"नमस्कार, मी सदाशिव पांडुरंग माने बोलतो. रा. घर क्रं ४३६, कोळसे वस्ती, फुले नगर क्रमांक २ येथून."
"काय तक्रार आहे?"
"तक्रार नाही ओ. ते आमच्या इथल्या नदीवर जो पूल आहे. म्हणजे बघा, दोन पूल आहेत. एक दुचाकी - चारचाकी वाल्यासांठी आहे आणि त्याच्यावरच पायी चालणाऱ्यांचीही सोय आहे बरंका! आणि त्यालाच पॅरलल दुसरा पूल आहे तो रेल्वेसाठी आहे."
"*&%$##%%&-**%$#"(हे, मॅडमच्या मनात!)
"तर, एक मनुष्य, अंदाजे ४० वर्षे वय, सडपातळ बांधा.. रं.... ग.... इथून लांबून दिसत नाहिये ओ."
"साहेब, काय झालंय त्या माणसाला?"
"नाही, काही झाल नाही, पण झालं तर? तो रेल्वेच्या पुलावर येरझारा घालतोय, रेल्वे आली म्हणजे, अचानक उडी-बिडी मारली तर? एक तर त्याला माहीत नसणार तिथे पाण्याची खोली कमी आहे. म्हणजे बुडून जरी नाही मेला तरी मार लागून नक्कीच मरेल."
"ठीक आहे, संबंधित हद्दीतील पो. स्टेशनला कळवते. पोलीस येतील पंधरा मिनीटात."
"अहो पण तो उडी मारेल का नाही माहिती नाही. एक काम करतो. त्या माणसाने उडी मारली की परत फोन करतो."

चाबळे मॅडमला त्या माणसाची निरर्थक बडबड आणि तीही निवांत, मुद्देसूद, ऐकायची नसल्याने त्यांनी फोन ठेवला.
आता पुढचा कॉल चाबळे मॅडमने नदीच्या अलीकडच्या पो.स्टे. ला लावला. अपेक्षेप्रमाणे हद्दीची उजळणी झाली तीच गत नदीच्या दुसऱ्या बाजूकडच्या सरकारी यंत्रणेची. शेवटी मॅडमने दुसऱ्या दिवशीच्या पेपरातली डिट्टेल बातमी दोन्हीकडच्यांना वाचून दाखवली.

पुढच्या पंधरा मिनीटात नदीपुलाच्या दोन्ही बाजूला एक-एक पोलीस जीप, फायरब्रिगेडच वाहन, रूग्णवाहिका आणि पत्रकारांची जत्रा अस साग्रसंगीतं लटांबर उपस्थित झालं. नदीपुलावरचा माणूस आता एका बाजूकडे कडे गुमान चालू लागला होता.
०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
- संदीप चांदणे (२९/११/२०१६)

Wednesday, November 9, 2016

गेम (शतशब्दकथा)

दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता.

चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!"

पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले. पुरावे नष्ट करण्यासाठीची सर्व तयारी त्याने केलेलीच.

दिवस बुडाला आणि खोपटात रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.

रात्री दारूच्या घोटांनी तिघांना कमालीचा थरार दिला. शंकऱ्या हसत ओरडलाच, "पाचशेला दिला न्हाय अब्दुल्यानी! गेलाच शेवट पोटात रूस्तूम्या! ह्याला म्हणत्यात गेम!"

- संदीप चांदणे (९/११/२०१६)

Thursday, June 2, 2016

कसा फुलताना दिसू?

कुठे बसू?

नाही ओठावर हसू
डोळा नुसतेच आसू
उभा आत जळताना
कसा फुलताना दिसू?

रूपाची तुझ्या चांदी
झळाळे उष्ण बेभान
माझ्या उघड्या मनाने
सांग कसे आता सोसू?

तुझी साद खोलवर
चिरत मला गेलेली
आता नव्या पाखरांच्या
गाण्यांना मी कसा फसू?

तुला मिळालाय कोरा
चकाकता तो आईना
माझी जागा सांग कुठे
सांग कुठे आता बसू?

- संदीप चांदणे (१/६/२०१६)

कविता होते

कविता होते

खोल खोल रूतलेल
तसंच सोडून दिलेलं
पुन्हा कधीतरी सललं,

पहिला पाऊस पडल्यावर
जुन्या वाळक्या खोडातून
नवं काहीतरी फुटलं,

कितीही खंबीर होऊन
तटस्थ, व्रतस्थ राहिलो
तरी आत गलबललं,

विसरलेला कप्पा आवरताना
तासनतास खिळवणारं
काहीतरी गवसलं,

जाणिवेत जवळ नसणारं
पण आठवणीत हसणारं
एक कुणी असलं,

मित्रांच्या संगतीत, निवांत
रात्रीच्या रंगल्या गप्पात
तिचं नाव निघालं,

की…

…कविता होते!


- संदीप चांदणे (२/६/२०१६)

Tuesday, May 24, 2016

हिरवीन

अरे हटाव बाजू हिमालया
आन फेअर ॲन्ड लवलीच्या
कापूसभरल्या भावल्यांना
तूच माझी हिरवीन खरी ग!
एकच बावनकशी ब्युटी ग!

झालो तर्राट आन लैच्च सैराट
खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ
लोकं बघणार कायबाय बोलणार,
तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!
आता ही येवढीच माझी ड्युटी ग!

काय सांगू, दिसते कशी तू
फुलावरली जणू पाकुळीच मऊ
ग्वाड गुलाबजाम पाकातला
आन रसमलाई सगळी फिकी ग!
तूच ग माझी, हायेस लै क्यूटी ग!

संदीप चांदणे (२४/५/२०१६)

Wednesday, May 11, 2016

मी मनातला...

मन खाई हेलकावे
खाली पिसापरि जाई
उतरे खोल खोल किती
पाय धरणीवर नाही

घेती कल्पना अफाट
रूप पाल्हाळ वेल्हाळ
व्हायचे ना त्यांचे काही
दोन घडीचाच खेळ

दोन घडीचा जरी तो
डाव भातुकलीचा रंगे
ना कुणी सोबती लागे
मन, मनाच्या जेव्हा संगे

मन तंद्रीत लागून
करे कसला विचार?
विचारता, गप्प गप्प
म्हणे विसरलो सारं!

जाई कालपरवाच्या गावा
हसण्या खेळण्या तिथे
कधी उद्यात डोकावी
आज विसरून मागे इथे

नाही मनाच्या पायाला
बेड्या कुणी बांधियेल्या
त्याच्या गावाला सीमाही
नाही कुणी रेखियेल्या

रे मना तू सांग इतकेच
आत राहून माझ्यात
का आहे ठाऊक तुज
मीच असतो तुझ्यात!

- संदीप चांदणे (७/५/२०१६)

समरस व्हावे ऐसे

थांबल्या पळी या प्रेमाच्या
क्षण एक तू डोळ्यांत पहा
कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा

दे शब्दांना आधार तुझ्या
गंधीत मौनाच्या साथीचा
दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे
थरथरत्या हळव्या अधरांचा

शीतल छाया, मी घनदाट तरू
तू वळणारी खळखळ सरिता
मी एक डोलता प्राण अचल
तुज पाहून, अविचल वाहता

मी धागा अतूट प्रितीचा
तू फूल एक नाजूकसे
गुंफता प्रित, गुंतता हृदय
प्रेममाला सुरेख शोभतसे

परिणीती, धुंद श्वासांची
लयदार काव्यात व्हावी
सूर जुळता ही तमवसने
कोमल स्वरात न्हावी

मी स्वत:स विसरून जावे
तू असे मला निरखावे
डोळ्यांनी तन्मयतेने
मग युगल गीत गावे

संकोच मनी, भारल्या क्षणी
ना स्पर्शे उभय चित्तांशी
तू अवघी तुला, मीही मजला
जोडतो समर्पणभावाशी

वेडेपण अन् आंधळेपण
असेल उरात जे काही
निथळूदे सारे सारे उत्कट
न राहो मागे उरले जराही

थिजूदे भौतिकता भवती
वा, उधळूदे जीवन वाटांतून
देऊ झोकून दोघांना दोघे
निळ्या गगनाच्या काठांतून

- संदीप चांदणे (५/५/२०१६)

जिवनाचं प्रतिक!

शहरच आहे हे...
धावणारं...जिवंत...गतिमान!
जिवनाचं प्रतिक!
धावतच राहणारं, तुलाही पळवणार
पळशील तू... जोर लावून, यथाशक्ती…
पण परिघाबाहेर नाही जाऊ शकणार
परीघाबाहेर गेलासही कधी...
तर पाहशील...
विशाल राने,
गर्दी करून उभी ठाकलेली वने
उत्तुंग गिरीशिखरे
नद्यांची विस्मयचकित करून सोडणारी उगमे
किलबिलाट पशुपक्ष्यांचा
लांबच लाब पसरून ठेवलेल निळ आभाळ
त्यावर शिंपडलेले
ढगांचे रंगीतपानी सडे
वाऱ्याचे निर्भेळ गाणे
कुरणांची डोलती शिरे
राशी कातळाच्या ओळींत
पठारावरची अनामिक फुले…
…निळी-जांभळी, पिवळी
मोकळी विहरणारी पाखरे
छे! सारं कसं निरर्थक! शांत शांत...
ये परतून शहरात...पहा
शहरच आहे हे...
धावणारं...जिवंत...गतिमान!
….जिवनाचं प्रतिक!

- संदीप चांदणे (११/५/२०१६)

Monday, April 18, 2016

हाय! मी फूल झालो नाही!

मला माळलेच जात नाही,
हाय! मी फूल झालो नाही!

तगमगतो जरी रात्रीतून
हाय! मी चंद्र झालो नाही!

चाललोय मी ज्या वाटेवर
हाय! ती कुठेच जात नाही!

पटात उरला प्यादा-राजा
हाय! ती जीत म्हणवत नाही!

डोळ्यांनी देते कुणी हाक
हाय! ते माझे नाव नाही!

फिरूनी, वाटे आलो जरी
हाय! ते माझे गाव नाही!

वाती इथल्याच चेतवाया
हाय! 'संदीप' झालो नाही!

- संदीप चांदणे (१७/४/२०१६)

Wednesday, April 13, 2016

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता खुर्दलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता बुद्रूक हे गाव तर लांबच!

कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर!

रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता.

भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे? बोलतील का? किती वेळ देतील? वगैरे प्रश्न घेऊन मी आणि माझा सख्खा मित्र, जळगाव - औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या वाकोद गावावरून आत शिरलो. साधं गाव, साधी माणस आणि गावात मुख्य गावापासून तीनेक किलोमीटर अंतरावर मळ्यातलं साधंच घर!

दुपारच्या रणरणत्या उन्हात आम्ही बिनअकली पोरं त्यांची झोपमोड करायला गेलेलो. त्यांच्या माणसाने आम्हाला बसवून घेतले व त्यांना उठवण्यासाठी गेला. आधीच भेटायचे निश्चीत केल्यामुळेच जरा हिंमत करून बसून राहिलो. दुसऱ्याच मिनीटाला महानोर दादा त्यांच्या खोलीतून अर्धवट झोपेने जड झालेले डोळे आणि अंग, पायांवर सावरीत आमच्याकडे आले. त्यांच्या चालण्यात थकवा जाणवत होता पण त्याचवेळी आम्हांला पाहून आम्हांला भेटण्याचा, आमच्याशी बोलण्याचा उत्साहही दिसत होता.

पुढचे दोन तास आम्ही कविता, गाणी, राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर स्वैर झुलत राहिलो. सुरूवातीचा औपचारिकपणा काही क्षणातच कुठल्या कुठे पळून गेला होता. पुढे, "अरे मग काय सांगतोय तुला!" "यातच खरी गंमत आहे रे" अशा त्यांच्या वाक्यांनी जणू जुन्या सलोख्याचा ओलावा तिथे निर्माण केला. त्यांच्या आठवणींचा, अनुभवांचा आणि विचारांचा खजिना त्यांनी माझ्यासमोर ओतला. त्यातून काय आणि किती वेचू असं मला झालं होतं! आज मी आधीपेक्षा आणखी श्रीमंत झालोय हे उघडपणे, ताठ मानेन सांगू शकतो! अर्थात, ही श्रीमंती पैशांची खचितच नव्हे!

माझ्या कविता नीट वाचताना त्यांना न्याहाळत असताना मला जाणवलं की दादांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला आहे. मध्येच एक भुवई जराशी वर जाऊन कुठल्यातरी शब्दाला दाद देत होती. ओठांचे हलके स्मित मला सुखावून जात होते. कविता वाचून त्यांनी अभिप्राय दिला की, "संदीप, उत्तम लिहिले आहेस! कुठेही उणीव काढायला तू जागा ठेवली नाहीस. आवडले! नाहीतर, आणखीही येतात, कवितांच भेंडोळ घेऊन. पण ते उलगडतानाच सांडून जात आणि केरसुणीनेच झाडून सुपल्यातून बाहेर टाकून द्यावं लागतं!" यावर ते मनमोकळे हसले, मीही रोखून धरलेला श्वास सोडत थोडा निवांत होऊन हसलो. माझ्या कवितांमध्ये अनुभवाची व्याप्ती वाढविण्याचा अमोल सल्ला त्यांनी मला दिला. त्याचबरोबर, लोकांसमोर येण्यासाठीच मार्गदर्शनही केलं.

दादांना वयापरत्वे एका डोळ्याने नीट दिसत नाही. पण, विचारातली सकारात्मकता पहा, अगदी दुर्मिळ! ते म्हणतात, "चला, एक डोळा ना आहे ना अजून टिकून, त्यावर चाल्लंय ना काम, मग तेवढं पुरे! बिचाऱ्याने(डोळा) दिलीच ना इतकी वर्ष साथ." इतक्या सहजपणे सांगत होते ते हे की जणू एखाद्या मुलाचा पेन हरवलाय आणि तो म्हणतोय चला पेन्सिल तर आहे ना अभ्यासापुरती, तिच्यावरच भागवूया! परिस्थितीने गांजलेली, निरूपाय, हताश झालेली अनेक माणसं आजूबाजूला आहेत. त्यातले बहुतांश धैर्य गमावून रडत असतात पण दादांसारखी माणसं त्यांच्या विचारातली सकारात्मक उर्जा मुक्तहस्त आपल्यालाही वाटत असतात.

दादांचा पहिला काव्यसंग्रह "रानतल्या कविता", त्याच्याबद्दल ते पहिल्या प्रेमासारखं बोलले. पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाल्यावरही आपले पाय जमिनीवरच ठेवून नेटाने त्यांनी अतिशय साधारण परिस्थिती असतानाही कवितेची साधना सुरूच ठेवली. पुरस्कार मिळाला तरी एका दिवसांत जादूची कांडी फिरल्याप्रमाणे त्यांच्या जीवनात साऱ्या सुख-समृद्धीने उडी नाही मारली. त्यासाठी त्यांनी शेतीतले परिश्रम आणि कविता ह्या दोन्ही गोष्टी अविरत चालू ठेवल्या. आणि दोन्हीकडे यशस्वी मळा फुलवला. एकीकडे 'पिकांचा' आणि दुसरीकडे 'शब्दांचा!'

समृद्ध जीवनाबद्दलची दादांची व्याख्या साधी-सरळ सोपी आहे. जे आवडत-जमत ते करावं, कोण काय म्हणत याची पर्वा केल्याशिवाय, चालत रहाव-चालत रहाव न थांबता. मग लोकं सोबत येत राहतात. भेटत राहतात, ऋणानुबंध निर्माण करतात आणि ह्या सगळ्या प्रवासाच्या गोल चक्रातून समृद्ध जीवनाचे सुंदर मातीचे मडके आकार घेत राहते. मातीचे यासाठी की, त्याला निरंतर जपावेही लागते. तुम्ही कुठेही दुर्लक्ष करून, गाफील राहून चालत नाही. नाहीतर त्या सुंदरतेला गालबोट लावणारे एखादे छिद्र त्या मडक्याला पडू शकते. अशा त्यांच्या समृद्ध जीवनाच्या विचारांतून त्यांनी मलाही समृद्ध केले.

दादांनी, त्यांच्या जीवनाचे अनेक पट त्यांनी उलगडून माझ्यासमोर ठेवले. त्यांना भेटलेले पुरस्कार त्यांनी आम्हांला स्वत: सोबत येत दाखवले. पद्मश्री पुरस्कार नेमका दिसतो कसा हे मी नीट पाहून घेतले. (कधी मिळालाच तर फसलो जाऊ नये म्हणून कदाचित!)अनेक जुने फोटो, जुनी माणस आणि मराठी मनाला अभिमान वाटेल असे क्षण छायाचित्रातून पाहताना विलक्षण गहिवरून येत होतं. पुलंचा दुर्मिळ फोटो पाहताना तर मला वेड लागेल का काय असंच वाटत होत. त्यांना न विचारता नको म्हणून आणि पहिल्याच भेटीत उतू जाईल इतका अतिउत्साह नको म्हणून त्या अनमोल ठेव्यांचे फोटो मी माझ्या कॅमेरात घेतले नाहीत. पण परत जाईन तेव्हा नक्की त्यांना विचारून घेईन.

पाय निघत नव्हता पण पुण्याचा परतीचा प्रवास लांबचा होता आणि मला ड्रायव्हिंग करायचे होते म्हणून नाईलाजाने आम्हीच भेट आटोपती घेत दादांचा आशीर्वाद घेत त्यांचा निरोप घेतला. "पुन्हा परत या!" अशा आपुलकीच्या शब्दांनी परतीच्या प्रवासासाठी जणू शिदोरीच मिळाली. पुढे औरंगाबादला आल्यावर प्रा. डॉ. दिलीप बिरूटे सरांना फोन लावला तर त्यांच्या सुदैवाने ते औरंगाबादेत नव्हते. ;) त्यांना त्रास देण्याची नामी संधी हुकली! ;)

"चला, साहित्यक्षेत्रातून कार्यक्षेत्रात परत जाऊया" ह्या मित्राच्या वास्तववादी बोलण्याने भानावर येत आमच्या गाडीने पुण्याच्या दिशेने वेग घेतला.


पुराव्यादाखल हा फोटो! ;)


दुर्दैवाने अजिंठ्याला थांबलो नाही पण तिथेच काढलेले हे काही फोटो!



अजिंठ्याकडे जाणारा रस्ता


अजिंठा पर्यटक केंद्र

घाटरस्ता


झाडामागून हळूच सटकणारा सूर्य ;)



औरंगाबादपुरता तरी, माझे नाव सर्वदूर पसरविण्याचा प्रश्न मिटलेला आहे! ;) (खरं, ज्यांच्या नावाने हा चौक आहे, त्या "सावित्रीबाई चांदणे" यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित असू नये हे वाटून मला प्रचंड खेदही झाला!)


- संदीप चांदणे (१३/०४/२०१६)

Saturday, April 9, 2016

वाऱ्यावरचा माणूस!

तो आला…

फकीरच भासत होता
खांद्यावरच्या झोळीवरून
आणि उरलेल्या, पिकलेल्या केसांवरून
शरीरभर जीर्ण झालेल्या
आयुष्याच्या खुणा मिरवित…

तो बसला…

कुणालाही न विचारता
रस्त्याच्या कडेला असलेल्या
पडक्या मंदिरापुढच्या झाडाखाली
अंगावर भरभरून घेत त्याची सावली
निवांतपणे पाय पसरत…

त्याने पाहिले…

अनेक अनोळखी नजरांचे गुच्छ
अन कुजबुजणार्या ओठांचे थवे
कौन है बाबा? किदरसे आये?
कुणीतरी पुढं होऊन विचारलंच
प्रश्नांच्या मोहोळाला उठवत…

तो हसला…

उत्तर द्यायच्या आधी, शांत आणि धीरगंभीर,
नंतर, आपलेच, एक म्हातारे झालेले बोट
त्याने आलेल्या दिशेवर ठेवले
एक चित्कार शहारला त्या तिथे
फ़डफ़डला सार्यांच्या पापण्यांत

तो जिंकला होता…

कारण, तिकडून आजवर
फक्त वाराच वाहत आलेला!

- संदीप चांदणे (०५/०४/२०१६)

Thursday, April 7, 2016

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :(

हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले!

शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :(

बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना!

म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण! च्याआयला, परीक्षेत मागनं ढोसंल की, बघतोच तिला!

मघाशी नेटपॅक संपलाय म्हटलो तर बाप खेकसलाच!!

- संदीप चांदणे (७/४/२०१६)

Wednesday, April 6, 2016

बोबडी कविता!

बाबाच्या पोटावर
झोपतय एक वेडं पिल्लू
तोंडामध्ये धरून बोट
हसतंय हळू खुदूखुदू!

इवल्याशा हाताच्या
इवल्या इवल्या मुठीने
ढुशी देत सारख्या सारख्या
करतयं मला गुदूगुदू!

बा - बा - का - का
मध्येच हसू खळखळून
बोबडं बोबडं गाणं एक
फिरतंय घरभर दुडूदुडू!


- संदीप चांदणे

चोरून बघणे - आधुनिक पद्धत (शतशब्दकथा)

परवा सहज तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं. नवा 'डीपी' आणि 'स्टेटस्' बघायला.

"Online" ह्या शब्दांतून जणू ती माझ्याकडे पाहतेय असंच वाटलं.... माझ्या हातापायातली शक्तीच गेली!
वाटलं, तिने पाहिल असेन का? मी तिचं प्रोफाईल बघताना. तिला मी "Typing..." असा दिसलो असेन का? बापरे! आता कस भेटणार तिला कॉलेजात?

आरारा, ओशाळून कसनुसं हसलो नि हळूच 'ब्याकचं' बटण दाबलं!

पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं, मग काहीच कस नाही लिहीलं. मग पुन्हा हिंमत करून तिच्या प्रोफाईलात गेलो आणि लिहिल... "आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग.... आई शप्पथ!....परत नाही बघणार."

सम्याचा काय मेसेज आलाय आत्ता बघूया......"आव्या, तुला शितलीचा भाऊ शोधतोय! :/ "

- संदीप चांदणे (५/४/२०१६)

Monday, March 21, 2016

दहशत - एका नव्या रूपात!

त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल. तिथल्याच एका क्युबिकलवर दोन्ही हातांनी रेलून उभा राहत ऑफिसमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या अंतराला दुपारच्या चहानंतरच्या एका निवांत वेळी, "कोण कोण असतं मग तुझ्या घरी?" असा साधासा वाटणारा पण ज्यायोगे तिथल्या वातावरणात नाट्यमय बदल व्हावा असा प्रश्न तिच्या सिनीयरने म्हणजे प्रशांतने विचारलेला. तंग झालेल वातावरण पाहून त्याच्या लक्षात आलं की, काहीतरी गडबड नक्की झालेली आहे. पण नेमकी काय? ते माहित नसल्याने तिच्या कसल्याही प्रकारच्या उत्तराला तो सज्ज झाला.
बऱ्याच जणांनी एव्हाना नाईलाजाने मॉनिटरमध्ये डोके खुपसले. काही जणांनी शेजाऱ्याकडे हॉरर चित्रपटातला प्रसंग समोर असल्यासारखा चेहरा करून आता काय? असे नजरेच्या आणि मानेच्या क्रिकेटमधल्या, हॅन्ड आय कॉर्डिनेशनप्रमाणे प्रावीण्य दाखवत विचारले. त्यावर तेवढ्याच सफाईने 'आता बस्सा!' असे उत्तरही येत होते. आणि आता तिला उत्तरासाठी सरसावून उभी राहिलेली पाहताना तर कित्येकांच्या काळजाचा ठोकाच चुकला! बऱ्याच कपाळांवर घामाचे थेंब जमा होऊ लागले!
आणि ती चेह-यावर आजच बीआरटी रस्त्याच उद्घाटन व्हावं आणि तो नवा रस्ता नव्या उत्साहाने भरून जावा तशी पूर्ण बहरात हसत बोलू लागली, "आम्ही ना सर दोघ बहीण-भाऊ आहोत! भाऊ इथेच आहे हिंजवडी आयटी पार्क मध्ये, आणि आईवडिल असतात घरी मिरजेला. तिथे माझे दोन मोठे काकाही राहतात. मी त्यांना बाबा१ आणि बाबा२ म्हणते. म्हणजे आमची एकत्र फॅमिली आहे. मोठे काका आहेत ना त्याना तीन मुलं आहेत. दोन मुलं- अमोलदादा आणि अशोकदादा आणि एक आमची अर्चनाताई. दोन नंबरचे काका आहेत ना त्यांना पण तीनच मुलं आहेत  म्हणूनच आमची आज्जी आमच्या बाबांना म्हणाली, 'सुधाकर' तू दोघांवरच बास कर.' सुधाकर म्हणजे माझे वडील! दोन नंबरच्या काकांच्या मुलांची नाव, अर्पिता, आरोह आणि अरूण अशी आहेत. कसल भारी ना?! (कसल? असं, प्रशांतच्या चेहऱ्यावर उमटल!) आमच्या सगळ्यांची नाव 'अ' वरून ठेवलीयेत! माझ्या लहान भावाचं नाव अर्णव आहे. आमच्या आजोबांना प्रणव ठेवायचं होतं. पण आमची आज्जी म्हटली, 'हॅट्ट! जमायच नाही! आता ह्या शेवट्ल्याचं तर 'अ' वरून ठेवलच पाहिजे.' आमची आज्जी खूप हुशार होती. सगळे तिला मानायचे. प्रणवशी कसं मिळतंजुळतं नाव ठेवल ना तिने?" प्रशांतला उत्तरासाठी वेळ न देता अंतरा पुढे बोलत राहिली, "आमचे आजोबा पण भारी होते. माझा खूपच लाड करायचे! माहितीये का? (इथे प्रशांतला फक्त मानेनेच 'नाही' म्हणता आले!) ते मला मुलगाच मानायचे, म्हणजे मी जरी मुलगी असले ना तरी पण त्यांनी माहितीये का मला मुलासारखंच वाढवल, माझे लाड केले. मी जोपर्यंत दहावीत होते ना, तोपर्यंत ते रोज मला शाळेत सोडायला यायचे! तशी माझी शाळा जवळच होती, दोन गल्या ओलांडून त्याच्या पुढच्या मैदानासमोर! आमच घर पण ना खूप मोठ्ठ आहे. म्हणजे पाहिजेच ना! एकत्र फॅमिली आहे ना आमची! आम्ही सगळे खूप धमाल करतो! अशोकदादा आणि अर्चनाताई एक नंबरचे हुशार आहेत माहितीये का? (इथे पुन्हा एक 'नाही' म्हणण्याचा प्रशांतने निष्फळ प्रयत्न केला!) माझी ट्यूशन तेच घ्यायचे. त्यांच्यामुळेच मी इंजीनियरींग करू शकले. माहितीये का? (आता प्रशांतची बॉडी दगडी पुतळ्यासारखी आखडून बसली होती!) ते दोघ शाळेत असल्यापासून ट्यूशन घ्यायचे आणि थोडेफार पैसे कमवून घरी द्यायचे. आमच्या घरातच नाही तर सगळ्या नातेवाईकांत त्या दोघांच कौतुक आहे! मला ते दोघ फार आवडतात. ते मोठे आहेत ना, ते पण माझा लाडच करतात. माहितीये का? (प्रशांत आता चक्क 'हो' म्हटला, तरी अंतराच चालूच!) ते पण ना मला मला मुलगाच समजतात आणि स्वत: एवढे हुशार असूनसुद्धा मलाच म्हणतात की तू खूप हुशार आहेस म्हणून. माझे बाबा पण ना मला विचारल्याशिवाय कुठले काम करत नाहीत. माझे दोन्ही काका पण ना, म्हणजे, त्यांच्या स्वत:च्या मुलांचा लाड करत नाही एवढा माझा लाड करतात. माझ्या २ नंबरच्या काकांच गोल आळीत बरोबर मध्ये कपड्याच मोठं दुकान आहे, तर ते कामानिमित्त म्हणजे नवीन माल वगैरे आणायला बाहेर जातात ना. म्हणजे मैसूरला वगैरे, तर न चुकता दरवेळी तिथून मला पाक आणतात. तो फेमस आहे खूप, मैसूरपाक म्हणतात त्याला! मला खूप म्हणजे खूपच आवडतो मैसूरपाक! इतका आवडतो ना की तुम्ही दुसरं काही जरी दिलंत ना मला मिठाई म्हणून खायला तर मी खाणारच नाही!" "कसा मिळतो हा मैसूरपाक?" प्रशांतला तिच्या बोलण्याच्यामध्ये ही जराशी जागा मिळाली खरी, पण असला पाचकळ प्रश्न विचारून तिला थांब म्हणायची दुर्मिळ संधी त्याने दवडली होती. दिवसभर टिच्चून फलंदाजी करणाऱ्या बॅट्समनचा स्लीपमध्ये कॅच सोडल्यावर स्वत: कॅच सोडणाऱ्याला आणि इतर टीम सहकाऱ्यांना जे काही वाटत असेल तसच त्यालाही वाटून गेल! आजूबाजूच्यांचे डोळे आणि देहबोली तेच सुचवत होती. एकदोन लांबचे ओठ 'हार्ड लक!' असे पुटपुटल्यासारखेही त्याला भासले.
" ऑं! कसा मिळतो म्हणजे? पॅक करून!" अंतराने भोळेपणात सुलोचना चव्हाण यांनाही इथे मागे टाकले! "अग तसं नाही, म्हणजे कुठल्या दराने, काय किलो असतात ते? असं?" अरेरे हे म्हणजे बॅट्समन त्रिफळाचीत व्हावा आणि नो बॉल निघावा असे झाल्याचे क्षणातच प्रशांतला जाणवले! आजूबाजूला काही हताश हातांच्या घड्या आणि पराकोटीच्या निराशेने केसातून घाईघाईने फिरलेले हात प्रशांतला अस्वस्थ करून गेले आणि या महापूर आलेल्या नदीवर नेमके कुठे आणि कसे धरण बांधायचे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.
" ते काय मला माहित नाही, पण मैसूरला स्वस्त मिळतो म्हणतात. आणि तिथलाच चांगला असतो. मी इकडचा दुसरा कुठला खात पण नाही! मी जेवण पण ठराविक प्रकारचं आणि ठराविक ठिकाणीच घेते. म्हणजे, मला पहिल्यापासूनच तशी सवय आहे, आमच्या घरच्यांनीच (गाडीने परत वेग घेतल्याचे पाहून प्रशांतही आता शांत झाला व शून्यात पाहू लागला! त्याच्या हातात कागदी कप होता चहाचा, तो आता गोळामोळा होऊन खोडरबराएवढा झाला होता.) अशी चांगली सवय मला लावली आहे. तशा माझ्या सगळ्याच सवयी चांगल्या आहेत! माझ्या रूममेट्स पण म्हणतात की, 'अग तू आहेस म्हणूनच इथे आम्हाला छान वाटत नाहीतर आमच काय झाल असत? ('मी आहे की' अस म्हणायला प्रशांत तयारच होता पण सगळे सिग्नलचे दिवे हिरवे करून अंतराची एक्सप्रेस सुसाट चालली होती!) तीन रूममेट्स आहेत मला. आम्ही खूप मज्जा करतो! (एरवी त्यांच्या मज्जा ऐकायला किंवा पाहायला प्रशांतला प्रचंड आवडले असते. पण आज.... आत्ता...) आम्ही तिघी वेगवेगळ्या फील्ड मधल्या आहोत. सर तुम्हाला 'बोर' तर नाही होत ना?" "अं...नाही, बोल की!" त्या अनपेक्षित प्रश्नाच्या गुगलीने प्रशांतची विकेट उडालीच आणि आजूबाजूला त्याचे निषेधात्मक पडसाद लगेच उमटलेही. कुठे स्टेपलर टेबलावर आदळला गेला, कुणी कागद भिरकावले, कुठे लोखंडी मोजपट्टी फरशीवर ठण्णकन् आदळली!
पण असल्या आवाजाने फरक पडेल ती अंतरा कसली! परत सुरू झाली, "सगळे म्हणतात की तू खूप बोलते म्हणून. पण मी काय करू ना! आता, आहे मला सवय! तशी प्रत्येकालाच कसलीतरी सवय असतेच ना! मग माझी सवय निदान वाईट तरी नाहिये ना. उलट मला फायदाच होतो. माहितीये का? (श्या! आपल्याला काहीच माहिती नाय राव! असे प्रशांतला वाटून गेले) शाळेत आणि कॉलेजमध्ये नेहमी वक्तृत्वस्पर्धेत माझाच नंबर यायचा! मी भाषणातही पुढेच असायचे. आमचे सर नेहमी कुठल्याही कार्यक्रमाला मला बोलायला सांगायचे. आणि मी पण कसलीही तयारी नसताना बोलायचेच! (त्याच प्रात्यक्षिक प्रशांतसोबत सगळं ऑफिस पहातच होत) मला म्हणजे खूप आवडत बोलायला!" इथे अचानक सगळे दिवे बंद पडून ऑफिसमध्ये अंधार झाला. ऑफिसच्या बिल्डींगमध्ये सकाळपासून जनरेटरच्या मेंटेनेन्सचे काम सुरू असल्याने अधून मधून वीज जात होती. दोन मिनीटांनंतर वीज पुन्हा आली आणि अंतरा परत बोलायला सुरूवात करते तोच तिला, आत्ता समोर असलेला प्रशांत दिसत नव्हता. जराशी हिरमुसल्यासारखी होऊन ती तिच्या जागेवर जाऊन बसली. शेजारच्या नमीताकडे वळून ती काही बोलणार तेवढ्यात नमीताला हिंदीत 'काटो तो खून नही' आणि मराठीत 'पळता भुई थोडी' झाली! खुर्चीवरून धडपडून उठत ती कशीबशी बाहेर रिशेप्शनकडे धावली!
इकडे कॅफेटेरियात प्रशांत अजून एक मोठ्ठा कप चहाचा घेऊन बसला, त्यात लिंबू पिळून प्यावे की काय असे त्याला वाटू लागले. आपल्या बाजूला येऊन उभा राहिलेल्या अमितकडे त्याच लक्षही नव्हतं. शेवटी अमितनेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तो भानावर आला. त्याने अमितकडे पाहिले, दोघेही कसनुसं हसले. प्रशांतने हातानेच अमितला बसण्याची खूण केली. तो बसत असतानाच प्रशांतच्या मनात आलं, च्याआयला, ह्याच पण नाव 'अ' वरूनच आहे! अमित प्रशांतला म्हणाला, "जाम बोलते यार ती! तुला माहित नव्हत ना?" "हो ना राव, कान शेकून निघाले! बहुतेक माझा प्रश्न चुकला, दुसर काहीतरी विचारायला पाहिजे होत का रे?" प्रशांतने विचारले. तसा झटक्यात अमित बोलला, "अरे नाही रे, तू तिला अगदी सहजच नुसत, 'काय, मजेत? निवांत का?' एवढ जरी म्हटला असतास तरी उत्तराची सुनामी आलीच असती." त्याच्या या बोलण्यावर दोघे परत बळेच हसले आणि चहा संपवून दोघेही ऑफिजात जायला निघाले तर समोरून अंतरा घाईघाईने त्यांच्याकडेच येताना दिसली. अमितने मनात 'मारूती स्त्रोत्र' म्हणत कॅफेटेरियाच्या काऊंटरची वाट धरली तर प्रशांत अंगाला लकवा मारल्यासारखा जागीच थिजून उभा राहिला. दहशत का काय म्हणतात ती हीच का? असे प्रशांत मनातून स्वतःलाच विचारू लागला!
"सर, मघाचं बोलण अर्धवटच राहून गेलं ना... बरं झाल तुम्ही इथे भेटलात...."
- संदीप चांदणे (२०/३/१६)

Sunday, March 20, 2016

माझ्या कवितेत!

जगून घेतो शब्द न् शब्द, जे नसते शक्य इथे प्रत्यक्षात
जेव्हा मी, माझ्यात बांधला गेलेला, सुटतो आणि शिरतो, माझ्या कवितेत!

जगतोय हे आभासी जग आहे की काय असले प्रश्न जेव्हा पडतात
तेव्हा वास्तवतेच्या चिमट्यांनी मी थेट जागा होतो, माझ्या कवितेत!

ह्यांची वाचून, त्यांची ऐकून, जेव्हा सगळ्यांच्या पाहून संपतात
मी मलाच, डोळे मिचकावत बसलेला असतो, माझ्या कवितेत!

कधी तर खोल अर्थ, गहन प्रश्न, छन्द-ताल, वृत्त हे कोणीही तिथे नसतात
मी जसा असतो रोजच, अगदी तसाच असतो नेहमी, माझ्या कवितेत!

शाईचे प्रमाण वा कागदाच्या कुठल्याही तिला सीमा नसतात
कारण माझे मन..
                   मनाचा कागद
                   मनाचा पेन....
                   ....मन शोधते
                   .... मनाला!
                          ...... हेच असतं नेहमी मनात अन् माझ्या कवितेत!

या इथे, घटकाभर बसा, माझे शब्द खुणावतात, प्रेमाने बोलावतात
बसून बघा, वाटले तर हसा, बघून तर जा, आहे काय, माझ्या कवितेत!

माझ्यासारखाच 'मी', तिच्यासारखीच 'ती', तुमच्यासारखेच 'तुम्ही', त्यांच्यासारखेच 'ते' इथे दिसतात
अहो, हे आणि असेच नसेल तर उरणार तरी काय? माझ्या कवितेत!

- संदीप चांदणे (२०/३/२०१६)

Thursday, March 10, 2016

येशील येशील येशील दोस्ता

येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील या सुरेल मराठी गीताचे हे विडंबन आहे!
मूळ कवी, संगीतकार,गायक-गायिका ज्यांनी या गाण्याला चिरतरूण सौंदर्य बहाल केलेलं आहे त्या सर्वांची माफी मागून हे विडंबन रसिकांपुढे ठेवीत आहे!
(मूळ गीताचे शब्द, जालावर सापडलेले वेगळे आणि गाण्यात वेगळेच असे दिसल्याने गाण्याची ही युट्यूबची लिंक देत आहे. मूळ गाणे आधी ऐकून आल्यास विडंबनाची खुमारी आधिकच वाढेल असे सुचवतो. किंवा कदाचित विडंबनाचा पचकाही होऊ शकतो. पण तो धोका पत्करण्यास मी तयार आहे, कारण, शेवटी वर्जिनल ते वर्जिनलच!)


येशील येशील येशील दोस्ता
पहाटे पहाटे येशील
माझिया पिण्याचे झालेले ते बिल
लगेच येऊन देशील!

होऊनी मी धीट, घेतली 'निट'
आणि हसे झाले भाऊ
तुझ्या खांद्यावर जरा टेकता
नको ना रागाने पाहू
(घरी)चल वजन पेलत-रस्त्याने झुलत
जरी तू विटून जाशील!

धुंद व्हिस्कीचा आणि स्कॉचचा
लाभला सुगंधी पेला
झाला तू कावरा, कारे बावरा?
धरलास वर तो अबोला?
उठण्यात-'बसण्यात', खाण्यात-'पिण्यात'
सदैव कंपनी देशील!

म्यानेजराचे तांडव, तूही जरा सांडव
तुझ्या खिशातल्या नोटे
तूच रे उदार, तुझाच आधार
तुझ्यात 'भरत' भेटे
सुरेच्या पुरात, नशील्या सुरात
तू माझा 'किशोर'(कुमार) होशील!

- संदीप चांदणे (१०/३/२०१६)



Friday, January 8, 2016

अन् मलाही!

अन् मलाही!

एक सांगू? ऐकशील?
ते कंगव्यातून सुटणारे केस
राहूदे तसेच, भुरभुरूदे
तेवढाच त्यांना विरंगुळा
अन् मलाही!

तुळशीच्या ओल्या मंजिऱ्या
परसबागेत फुले सारी
फुलतात, खुलतात तुझ्यासवे
साऱ्यांना त्या खुलू दे
अन् मलाही!

वाराही कधी लाडात येतो
पदराशी सलगी करतो
तू तशीच राहा, मला सावरू दे
खेळू दे त्या दोघांना
अन् मलाही!

मोकळी छान हसताना
इकडे तिकडे पाहताना
वेडी डूलं झुलत राहतात
झुलू दे त्यांना मजेत
अन् मलाही!

गालावरच्या खळ्यांना
लाल ओठ नि चंद्रबिंदीला
न्याहाळत बसतो आरसा
पाहू दे ग निवांत त्याला
अन् मलाही!

- संदीप चांदणे (८/१/२०१६)

Monday, January 4, 2016

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी!


कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं
हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं

ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं
आता फक्त ऑफिस की हो उरलं!
मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर.
कोण नाही पर्वा करायला
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला!

रात्रभर एकटा बसू कसा?
क्लायंटला अडचण सांगू कसा?
बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे
जातात टायमात ते घरला!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

जमेल तेवढं खेचून मी काम
नाही केला आजिबात आराम
सकाळचा नाष्टा, रात्रीचं जेवण
मिळेना आजकाल बघायला!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

थंडीत मरणाचं गारठून
पावसात येतो मी भिजून
उन्हाच्या झळा, माझ्याच भाळा
जातोच सुट्टी मागायला
कुठं कुठं जाऊ मी सांगायला

- संदीप चांदणे (२/१/२०१६)

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...