मधुर शीळ मी वार्याची, पावसाची मी सन्ततधार, सडा पाडतो गीतांचा, मी शब्दांचा जादूगार....
Wednesday, December 31, 2014
रूततेच आहे
Monday, October 13, 2014
अकबर - बिरबल (मेहुण्याची शिफारस)
[दृश्य : अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष. बेगम अकबर बादशाची वाट पाहत पलंगावर फळांचे ताट समोर ठेऊन त्यातील सफरचंद चाकूने कापीत आहे. आणि बादशहा अकबर तिच्या कक्षाकडे चालत येत आहे.]
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्थळ : बेगमचा शयनकक्ष
काळ : निवांत बसून गप्पागोष्टी करण्याचा
वेळ : सायंकाळची
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पात्रे :
1) अकबर
2) बेगम
3) बिरबल
4) बेगमचा भाऊ म्हणजेच अकबराचा मेहुणा
5) शिपाई नं. 1
6) शिपाई नं. 2
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(अकबर बेगमच्या शयनकक्षासमोर येतो व पाहतो तर आपण आल्याची वर्दी द्यायची सोडून दोन शिपाई व्हाटसअपवरचे जोक वाचून हसत आहेत. अकबर त्यांच्यामागे उभा राहिला तरी त्यांना पत्ता नाही.)
अकबर : (जोराने ओरडून) नालायकांनो, चिरा पडली तुमच्या तोंडान, हे काय करताव? (दोघेही शिपाई दचकतात व अकबराला पाहून खूप घाबरतात)
शिपाई नं. 1 : (वेडगळपणाने) बादशहानु, आम्ही जोक वाचताव. तुम्हाना सांगतो अस्ला जबरी हाये... (दुसरा शिपाई पहिल्याला चिमटा काढून त्याला शांत बसायची खूण करतो)
शिपाई नं. 2 : (चाचरत) बादशहानु जल्ला तुम्ही आलाव?? जल्ला मंग त्या मांगच्या शिपुरड्यानी वर्दी दिल्याली मना ऐकू कशी नाय आली??
अकबर : (वैतागून) आर त्योबी जल्ला फेसबुकावर कुण्या पोरीची फ्रेन्ड रिक्वेस्ट आल्याली समद्यांना दाखवत बसलाय. आरे तुम्हाना काय लाज लज्जा शरम?
शिपाई नं. 1 : आमचा दादूस बोल्ला कोण्च्या बी कामाची लाज धराची नाय...(पुन्हा एक चिमटा काढून दुसरा शिपाई त्याला थांबवतो)
शिपाई नं 2 : बादशहानु, म्या तरी ह्याला सांगत व्हतो, कॅन्डी क्रश लाव. एक डाव मांजा, एक डाव तुजा आस खेळू पण यानीच व्हाटसअप लावून मना जोक वाचाया लावलान. मंग मी हसणारच ना तुम्हीच सांगा तुम्हीबी हसला अस्ताव का नाय जोक आयकल्यावर?
अकबर : (वैतागून) ए अरे ए...पण हॉपिस हावर्स मध्ये तुम्ही ऑन डुटी कस काय मोबाईलवर टाईमपास करताव??
शिपाई नं. 1 : (पुन्हा वेडगळपणाने) ह्यो काय असा. (हातातला मोबाईल समोर धरतो आणि हसत हसत स्क्रोल करू लागतो)
अकबर : (वैताग, राग, चिडचिड एकदमच आणत) आरे कसा करता म्हंजे करून दाखवतय रे मेल्या. बंद करा ते आन काम करा कामाच्या येळेला! (दोघेही शिपाई खाली मान आणि खांदे टाकून उदास चेह-याने आपापल्या जागेवर म्हणजेच दरवाज्याच्या दोनही बाजूला उभे राहतात आणि वर्दी द्यायला सुरू करतात.)
शिपाई नं. 1 : बाहिथ बघ
शिपाई नं 2: बा खाली जा
शिपाई नं 1 : हुश्शार!
दोघेही शिपाई : बादशा अकबर येत्यात हो ~~ (अकबर आत शिरतो)
बेगम : (वैताग चेह-यावर स्पष्ट आणित) ह्यो कंचा टायम म्हणायचा? हिथ सफरचंद चिरून चिरून आवरे बारीक झाले की आता फोडणीलाच टाकणार व्हते.
अकबर : (रोमॅन्टिक आवाजात) अग आवरे... तुज्या हातच कारल बी मना गोरच लागतय, मंग जल्ला ह्ये तर सफरचंद हाय ना?
बेगम : (लाजत) जावा तिकरं!
अकबर : (मागे पाहत) तिकर काय सरप्राईज ठिवलय का?
बेगम : झाला का तुमचा पांचट ज्योक मारून...आता मी काय सांगते जरा कान देऊन ऐका. (अकबर सावरून बसतो) मांजा भाव, दोन - चार जांगेवर हिन्टरव्ह्यू देऊन आलाय पण त्येला जॉब मिळालेला न्हाय. आन त्यो तर लईच हुश्शार हाये तवा त्येला तुम्ही तुमच्याकडच ठिऊन घेवा.
अकबर : आवरे, जल्ला त्यो जर आवराच हुश्शार हाये तर त्येला त्या दोन - चार जागेवाल्यांनीच का न्हाय घितला?
बेगम : (चिडून) जल्ला मांज्या माहेरच्या लोकांचा काय बी तुम्हांना बघवतच नाय. मी जातेच आता माहेराला. मंग बसा एकटेच सफरचंद खात! (सफरचंदाच ताट आदळते)
अकबर : (विनवणीच्या सुरात) आग आवरे, तसा नाय, त्येला चांगला जॉब लागूदे. मी कुठ काय म्हणतोय.
बेगम : हां, मंग त्येला तुम्हीच जॉब देवा!
अकबर : अग पण आवरे त्येला तर ऑटोकॅड पण तर नाय येत. मंग त्येला कोण्च काम देऊ मांज्या हापिसात?
बेगम : (उपरोधाने) तुमच्या बिरबलाची तर लय मोठी डिग्री हाये ना. मंग सगळे लोक कामावरन कारा आणि एकट्या बिरबलालाच ठीवा की कामासाठी.
अकबर : (पुन्हा अजिजिने) अग आवरे चिरू नको, तू म्हणतेस तर त्येला ठिऊन घेतो कामाला. पण काय कामासाठी घिऊ, मना कलत नाय.
बेगम : त्येला बिरबलाच्या जागेवर डिटेलर म्हणून घ्या.
अकबर : आग आवरे! बिरबल तर आमचा ब्येस डिटेलर हाय. त्येच्या बराबरीत तुजा भाव कुठच नाय. मंग बिरबलाला कारायचा कसा?
बेगम : तुम्ही मांज्या भावाला वलकत नाय! त्येच्या हुशारीची कहाणी आमच्या गावात समद्यांना तोंडपाठ हाये. आणि आता जर तुम्ही त्येला कामावर नाय घेताव तर मी चालले माहेराला. मांज एशियाडच बुकिंग करून देवा.
अकबर : आवरे, हे बघ, तुना कुठबी जायाची गरज नाय. आपण आताच हिथ तुज्या भावाला आन बिरबलाला बोलवून घिऊ आणि त्यांची टेस्ट घिऊ. तुज्या समोरच निकाल लागूदे दोघांचा.
बेगम : ठीक हाय!
अकबर : (टाळी वाजवतो) जल्ला कोण हाये का तिकरं? (शिपाई नं. 1 हातात मोबाईल धरून काहीतरी टाईप करीत आतमध्ये येतो.) आरे ये कालतोंड्या, मोबाईलसकट फिकून दीन आठव्या मजल्यावरन. जवा बघाव तवा मोंबाईल-मोंबाईल. आवरा काय अस्तय रे त्याच्यात?
शिपाई नं. 1 :(मोबाईल पुढे करीत) रिचार्ज वर ऑफर हाये. रिचार्जवर एक पिझ्झा फ्री!
अकबर : बाबो, पिझ्झा! मंग माजा बी धाचा छोटा रिचार्ज कर!
शिपाई नं. 1 : बादशहानु छोटा रिचार्ज आता पन्नासचा झालाय, तुम्हांना परवरतय का सांगा? लगीच करतो. पण अर्धा पिझ्झा मना बी पायजे.
बेगम : (वैतागून जोरात ओरडते) आरे गप बसा तुम्ही दोघबी. मांज्या डोक्यांचा पिझ्झा होतय.
अकबर : अरे शिपाई, जा आमच्या मेवण्याला जिथ आसल तिथ जाऊन सांग, तूना बोलावलंय हाय म्हणाव बादशहानं!
(शिपाई जातो आणि बादशहाचा मेहुणा वेडे चाळे करत आत येतो.)
मेहुणा : बादशाहाचा ईजय चव्हाण असो! (दात विचकत फिदीफिदी हसतो)
अकबर : वा! आवरे ह्यो तर खरंच लई हुश्शार हाये!
बेगम : असू दे! ईचारा काय इचारायचंय ते!
अकबर : (हातातला एक पेपरचा गठ्ठा मेहुण्यासमोर टाकत) हे काय हाये सांगतोस का?
मेहुणा : ह्यो कागदाचा गठ्ठा आहे. (स्वत:च्या हुशारीवर खूष होऊन दात काढतो. बेगम पण त्याच्या डोक्यावरून गहिवरून हात फिरवून बोटे मोडते)
अकबर : (आता वैतागून दुसरीकडे पाहत) ह्येच्यावर काय दिसतंय तूना?
मेहुणा : (खूप निरखून पाहिल्याचा आव आणीत) जापन्ना ह्येच्यावर मना लय काल्या काल्या लायनी दिसत्यात आन एक गारीबी दिसते. पोंम पोंम! (पुन्हा दात विचकतो)
अकबर : (मनात आधी 'बास' म्हणतो) शाबास! आता मना सांग ह्ये गारीच्या बाजूला घर हाये ते कराया तूना कितके दीस लागतीन?
मेहुणा : (छाती फुगवून) लय दीस लागतीन!
अकबर : बेगम, आता मी बिरबलाला बोलवतो! (ताली वाजवत) ये व्हाटसअप वाल्या हिकर ये! (शिपाई आत आल्यावर) जा बिरबलाला सांग आम्ही बोलावलंय!
(शिपाई जातो आणि बिरबल बादशहा आणि बेगम यांना मुजरा करत आत येतो.)
बिरबल : बादशहा सलामत आन बेगम यांचा ईजय असो. बोला सरकार आम्हाना कशाला बोलिवल हाय.
अकबर : (पुन्हा तोच कागदाचा गठ्ठा बिरबलाला दाखवत) बिरबल हे काय हाये?
बिरबल : (कागदाचा गठ्ठा हातात घेतो आणि सावकाशपणे एक-एक पान उलटत पाहतो.) बादशा सलामत, ह्यो मोशीतला एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट "बेव्हरलीक्रेस्ट" हाये. हिलसाईड असल्यामुले हिथ पाईल फौण्डेशन लागणार हाये आणि ह्यो समदा प्रोजेक्ट कराया अंदाजे एकशेसोला तास लागतेन!
अकबर : (बेगमकडे पाहून विजयी स्मितहास्य करीत) बघ आवरे! मी तुना पैलच बोल्लो व्हतो. बिरबल आमचा ब्येस डिटेलर हाये!
बेगम : (रागाने हातात सफरचंदाचं ताट घेते आणि भावाला मारीत सुटते.) कालतोंड्या, बावलटा, आवरा कसा येरा निघाला तू, माझी सगरी विज्जत घालीवली. तुना आता जित्ता नाय सोरत!
(मग अकबराचा मेहुणा बहिणीचा मार चुकवत पळू लागतो, बहिण त्याच्यामागे पळते आणि पडदा पडतो.)
(केवळ विनोदनिर्मिती साठी आगरी/मालवणी/कोकणी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांपैकी कुठल्याच भाषेवर माझे प्रभुत्व नसल्याने हा प्रयत्न गोड मानून घ्यावा ही विनंती)
- संदीप चांदणे (13/10/14)
Friday, October 3, 2014
दिवाळी बोनस मिटींग!
ढीस्क्लेमर : सदर कथेतील पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत तरी याचा कुठल्याही व्यक्तींशी संबध येऊ शकतो. तसा आल्यास व तो आल्याचे पाहून तुम्ही हसलात तर याला लेखक(च) जबाबदार नसेल असे ठामपणे नाही म्हणता येणार!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[दृश्य : एका नामांकित प्रा. लि. कंपनीच्या ऑफिसात असलेल्या कॉन्फरन्स रूममध्ये, ऑफिसातला ठरावीक स्टाफचा गट आणि व्यवस्थापन (म्यानेजमेण्ट) मधून असलेले दोघेजण असा एकूण जमाव या वर्षीची दिवाळी बोनसची रक्कम किती असावी यासंबधीची चर्चा करण्यासाठी जमलेले आहेत.]
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्थळ : जिथे सर्वसाधारण कर्मचारी गेलाच तर १) फोनवर बोलायला २) डुलकी मारायला जातो, असे, कॉन्फरन्स रूम!
काळ : आ वासून पगार खायला टपलेला, दिवाळीअगोदरचा!
वेळ : मिटींगसाठी जमलेल्या निम्म्याजणांवर आलेली!
प्रसंग : खरंतर अवघड, गंभीर, पण, तसा न होता इतर सर्व मिटींगप्रमाणेच विनोदी!
पात्र परिचय :
१) सतीश बागेमार : सीनियर फ्रॉम म्यानेजमेण्ट
२) सागर सांबरे : ज्युनीअर फ्रॉम म्यानेजमेण्ट
३) कॅप्टन : प्रोजेक्ट म्यानेजर
खालील सर्व प्रॉडक्शन स्टाफ मेंबर!
४) आबा ५) संतोष ६) विनायक ७) सॅन्डी ८) वेंकट ९)शिबा १०) अपर्णा ११) अमित काटवटे १२) विनोद १३)दीपक १४) अभिषेक
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(सर्व मंडळी हळूहळू केबिनमध्ये जमा झाली. केबिनच्या बाहेर असलेली कुजबूज, फिस्सकन हसणे वगैरे केबिनच्या आत आले की विरून जात होते. खुर्च्या कमी असल्याने कुणी बसावे कुणी ऊभे रहावे विचार करण्यात दोन मिनिटे गेली. पुन्हा प्रत्येकजण दुस-याला 'तू बस', 'तुम्ही बसा', 'नाही हो, तुम्ही बसा', 'बस की', 'नाही, मी ठीक आहे' इत्यादी करण्यात अजून दोन मिनिटे गेली. मग आबाने खुर्ची ओढून बसल्यावर आपोआप बाकीच्या खुर्च्याही भरल्या गेल्या. बाकी मंडळी खुर्च्यांच्यामागे उभा राहिली. आणि एक शांतता मिटींगला मिळाली.)
स.बा. : हं बोला!
आबा : (कोण बोलतंय का हे आजूबाजूला पाहत) ओ विनायक सर, बोला की!
विनायक : अरे शिट! ही लेव्हल पारच हुईना झालीय साली. हां… काय? बोला बोला, तुम्ही बोला! (पुन्हा कॅन्डी क्रशमध्ये डोकं घालून बसतो.)
सा.सां. : (मिटींगमध्ये काय होईल याचा अंदाज आल्याने) हां ऐका ना! मी काय म्हणत होतो. सगळे ब्वां इथं आलेच आहेत तर मी ना गजाननला नाही का, चहा इथेच घेऊन यायला सांगतो. (तो तिथून पसार!)
(लगेच त्याची खुर्ची रिकामी झालेली पाहून तिच्याकडे दीपक व विनोद एकाचवेळी सरसावतात आणि ही गोष्ट लक्षात येऊन ओशाळून एकमेकांना, 'बैठो-बैठो', 'नाही नाही बसा' अशा बैठो-बसा मध्ये अमित काटवटेनी हळूच ती खुर्ची बळकावली, व काहीच झाले नाही असा चेहरा करून पुढे कोण बोलतंय ते पाहू लागला)
कॅप्टन : (इतका वेळ शांत-धीरगंभीर बसल्याने झालेल्या 'जड' चेह-यावर उसने हसू आणत) सी, बागमार साहेब… देअर आर लाईक ए बटालियन, ए आर्मी…
आबा : (कॅप्टनला मध्येच थांबवून, विनायककडे पाहून वैतागत)तू थांब, वेंकट बोल!
वेंकट : होका कसय सर, मी काय म्हण्तो, मागल्ल्या वर्शीबी तुम्ही बोनस दिलता, नाह्य म्हणत नाह्य, पण मी एक जोड कापड घ्यायचो ती म्हणल एक प्यांटच घिऊ चांगली, म्हणून कनाय पिंपरीला गेलो. तर त्यो दुकानदार म्हणतो कसा, 'ह्या पयशात प्यांट नाही "नाईट" प्यांटच यीन. आता बोला!'
विनोद : देखो कैसा है, मै तुमको बोलता हू, अभी देखो जिनके बाल-बच्चे है, मानलो मेरा रीषी मेरेको बोलेगा, 'पापा, दिवालीमे सिंघम बम लावो', या साहिल मेरेको बोलेगा, 'पापा, मेरेको वो सामनेवाले समीरके जैसाच ड्रेस लावो. तो बतावो, कैसे करनेका?
स.बा. : (वाजपेयी ष्टाईल) तो, अरे मै क्या बोल रहा हू… यू शूड रादर कम अप विथ ए सोल्यूशन.
अभिषेक : (मध्येच) बट सड…
आबा : (वैतागून, त्यालाही मध्येच थांबवत) चूप! तू चूप… बट सड कुठला!
अपर्णा : (बाकीच्यांच्या सुरात आपला वेगळाच सूर मिसळत) वाव! म्याडम, ये लाल साडी मस्तच है! कब ली?
शिबा : अरे, ये तो बहुत पुरानी है. मेरे देवर के साली के चचेरे भाई के मौसी के नणंद के जीजाजी…(थोड थांबून विचार करत…) नही…मेरेगोभी अभी याद नही लेकिन, किसीके शादीमे मेरे हजबंड ने मेरेगो दी थी!
सॅन्डी : मुद्याच काहीतरी बोला राव!
कॅप्टन : सी, ब्रिगेडीअर ह्याज टू प्ले डिफ़रण्ट रोल आणि…
आबा : (कपाळावर हात मारत) संतोष…
संतोष : (स.बा. कडे पाहत) मला वाटतंय, ह्यावेळेला तरी तुम्ही जरा कन्सीडर केल पाहिजे सर!
अमित का. : व्हय की. आमच्याकड किणी दीड पगार देत्यात, बोनस म्हणून….कोल्हापुरात! आम्हालाबी तवा दिलता, लय मज्जा आलती.
आबा : काटू! मंग आम्हालाबी का नाय बोलवलं मज्जा कराया? गावटी…नॉनसेन्स!
विनायक : झाली बाबा लेव्हल पार एकदाची. हॉ…हॉ…हॉ.
आबा : ओ सर, विनायक सर, हिथ कॅन्डी बी नाय मिळायची, हिथ लक्ष घाला की जरा!
शिबा : मेरेगो लगता है की, विनायकको बोणस मिला है! तबी कॅन्डी क्रश केलंनेके लिए नया मोबाईल लेके आया है!
विनायक : आरे म्याडम, नया फोन लेनेसे पेहले मेरेको लोन लेना पडेगा. अभी घरपे वाईफने दो साडी दो ऐसा बोला है, फोन लुउंगा तो साथमे एक डझन तो कमीत कमी साडी लेनी पडेंगी मेरेको!
सा.सां. : (केबिनचा दरवाजा बाहेरून हळूच उघडून) अरे! गजाननने चहा आणला नाही का अजून? (कुणाच्या उत्तराची वाटही न पाहता लगेच निघूनही जातो, दोघे-चौघे त्याच्याकडे पाहत आपण का आलो इथे, असा विचार करतात)
वेंकट : (आवाजाची आधीच वर असलेली पट्टी अजून वर चढवीत) ओ सर बोला की! आकडा तरी सांगा राव!
स.बा. : (पुन्हा वाजपेयी ष्टाईल) ओके, मी बोलतो तस वर आणि कळवतो तुम्हाला काय होतंय ते.
(स.बा. उठून बाहेर जातात, पाठोपाठ ज्यांना घाई आहे ते लोकलमधल्या प्रवाशांसारखे स्टेशन आल्यावर दरवाजात गर्दी करतात तसे कॉन्फरन्स रूमच्या दरवाजात कुणीच नीट बाहेर पडू नये याची काळजी घेत उभे राहतात. मागे रेंगाळलेल्यांमध्ये कॅप्टन, आबा आणि सॅन्डी. विनायक अजूनही खुर्चीतच बसलेला कॅन्डी क्रश खेळत!)
कॅप्टन : सी आबा-सॅन्डी, मी हेच म्हणत असतो नेहमी. ते सोल्जर्स कसे असतात, आणि ते कमाण्डर्स. बॅटल असते का नाय, ती जिंकली तरी सोल्जर्सना प्रिपेअर्ड राहायला लागत यार. बीकॉज यू नेव्हर नो, देअर इज ए वार कमिंग अप.
सॅन्डी : यू आर राईट कॅप्टन! चला, मिटींग संपली!
- संदीप चांदणे (३/१०/१४)
Sunday, September 28, 2014
शेंदूर
बराच वेळ बसल्याचे, माझ्या, उशिरा लक्षात आले
दगडासोबत जेव्हा त्यांनी, मला शेंदूर फासले!
- संदीप चांदणे (28/9/14)
Thursday, August 14, 2014
बाला - 2
मऊशा उन्हात
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत?
कवळून आळस
गाठला कळस
चालली नाजूका
सावलीच्या मायेत
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत?
जगाचा विसर
चालही सरसर
कुठल्या तालात
कुणाला माहीत!
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत?
पायघोळ झगा
दावितो फुगा
भासे चित्र
ते जलरंगात
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत?
- संदीप चांदणे (14/8/14)
Monday, August 11, 2014
ते तेरा
शिवशंभोच्या शरणी गेले
कपाळी त्रिशूळाचा टिळा
मुखी बम बम भोले!
तेराही ते जरा न भ्याले
मस्त झाले, रिचवून प्याले
सरसर चढूनी त्या चढणीवर
'नागफणी' ती तुडवून आले!
तेराही ते हरखून गेले
निसर्गापुढे नत झाले
सह्याद्रीला भरून श्वासात
घाटमाथ्यावर धुंद नाचले!
- संदीप चांदणे (11/8/14)
Tuesday, August 5, 2014
विरह
बुडून बसले काळोखात विरहाचे क्षण माझे
स्वप्नांचाही गुंफता येईना, गोफ, डोळे मिटून
विचारात जागते माझी, रात्र, कूस बदलून
उधळीन तुझ्या वाटेवर, जे तुला हवे
येशील का सांग, तू श्रावण सरींसवे?
- संदीप चांदणे (5/8/2014)
Thursday, July 10, 2014
हिरवा पाला
काळ्या मातीचा धनी, मनी सुखावला!
लवे प्रकाशाची कांडी धुरकट लोळामध्ये
जो तो घरा-दारा निवा-यात विसावला!
आले चैतन्य सृष्टीत, लगबग पाखरांची
कापसाची मऊ गादी सुगरणीच्या खोप्याला!
होईल रे दूर आता सारा पाचोळ्याचा भार
झाडाझाडांवर पुन्हा हिरवा दिसेल रे पाला!
- संदीप चांदणे (10/7/14)
Sunday, July 6, 2014
घरट्याची ओढ
एक पाखरू एकटे
शीळ देई वारियाला
सांगे जा तू घरट्याला
वारा उनाड बावरा
घुमे वेळूच्या भवती
म्हणे वेळूचे गे गाणे
गळा भर, पाखराला
पारा उन्हाचा महान
लखलख मृगजळ करी
कंठी पाखराच्या परि
पाऊस घरचा ओला
जीव बनी अडकला
जीव एक घरट्यात
देई हळवा संधिकाल
बळ नाजूक पंखाला
- संदीप चांदणे (6/7/14)
Thursday, July 3, 2014
Saturday, June 21, 2014
दुसरा
विजयी होउन
दुसरा तो
जाई विसरून
पाणी जाणत
रक्त सांडले
अंतरी साहस
ना उणे मोजिले
पाय रोविला
जोवर भूवरी
नसे विश्रांती
विरोधी उरी
नियतीचा पासा
जरा पलटता
होई उन्माद
अन् अतिरेकता
कुणा मनी ना
लक्ष्मणाचा त्याग
द्वेषाचा बळी
वालीचा राग
अर्जुनाच्यामागे
कर्ण मानी
सिंहासम शिवा
शंभू-छावा जनी
इतिहास थकला
वर्तमान सांगे
भविष्याच्या मनी
पहिल्याचे दंगे
ह्रद्ये जिंकली
लाखो जरी
मुकुट साजे
एकाच्या शिरी
सरोवर सुंदर
पहिल्याच्या माथी
वेदना दुस-याच्या
लाटा होती
पहिला शोभेना
दुसरा नसता
सत्य हेच
कसे विसरता?
जो तळपतो
तोही ढळेल
नवा उगवल्याचे
पुन्हा कळेल!
इथे किती
लढले - पडले
काळाने ना
कुणा गणले
तुम्ही आम्ही
मोजतो ओळी
लावून चष्मा
विसरून टाळी
मुळात हवी
टाळी खेळाला
राखेतून उठणा-या
फिनीक्सपणाला!
- संदीप चांदणे (23/6/14)
Monday, June 2, 2014
लावणी
नार दिसे तू नख-याची
मनात ठसे रूप तुझे ग
रती भासे तू मदनाची!
लढण्याआधी पडती सारे
असा तुझ्या नजरेचा वार
तुझ्यापुढे ग गुलाम सारे
राणी तू ग हुकुमाची!
भरदिवसा ना दिसते तू
चंद्र जसा तो नभी नसे
तुला पहाण्या रात्र पुरेना
लाली खुणावते पूर्वेची!
Sunday, June 1, 2014
शंकाच आहे!
मेल्यावर मी तिच्या डोळ्यातून
एक तरी थेंब सांडेल? शंकाच आहे!
मी मेलोय हे तरी
निदान तिला कळेल? शंकाच आहे!
एक दिवस ठरवून
तिच्यासमोर मन ओतले
बोललो सारे-सारे
तिनेही ऐकून घेतले
पण तिला कळाले? शंकाच आहे!
गेली वा-याच्या झुळुकीसारखी
वादळ मागे ठेउन
झुंजतो मी त्याच्यासवे
रोज तिला आठवून
गेली तशीच परतेल? शंकाच आहे!
धडपडलो नाही तिला
विसरून जाण्यासाठी
ना फार प्रयत्नात आहे
तिला लक्षात ठेवण्यासाठी
तिच्या मनाच्या कोप-यात मी...? शंकाच आहे!
आता रडतो कधी
कधी तर हसतोही
उदासवाणा बसतो कधी
तिच्या आठवणीत गुरफटतोही
तिच्याकडे हे घडेल? शंकाच आहे!
विसरली माझ्याकडे ती
रुमाल मलमली तिचा
बोचतो हाती घेताच
आठवातला स्पर्श तिचा
माझे तिच्याकडे काही असेल? शंकाच आहे!
डाव मोडला मांडण्याआधी
मनोरा ढासळला रचण्याआधी
नवीन डाव मांडू?
नवीन मनोरा रचू?
मांडला जाईल? रचला जाईल? शंकाच आहे!
- संदीप चांदणे (1/6/14)
Monday, April 14, 2014
व्यथा
पाखरे चिमुकलीच!
चिमुकल्या घरात
स्वप्ने चिमुकलीच!
झाल्या खोल्या
घरट्यात साऱ्या
खोल्यात विसरलात
नात्यांची खोलीच!
जमवूनी कळप
केलीत शिकार
शब्दांनी तोडलीत
लचकी आपलीच!
तुझे माझे
नसावे जिथे
हक्क सांगून
जागा दाखवलीच!
नव्हती अपेक्षा
पानाचीही कधी
हिरावलीत तरी
मायेची सावलीच!
तोडण्या साऱ्यांचे
हात लागती
जोडण्या पुकारा
पाठ फिरवलीच!
डोळेही नाही
पित्याचे सोडले
भागीरथी प्रयत्ने
गंगा आणलीच!
मनाच्या आत
शिरून पहा
मीपणा सोडून
पहा लागलीच!
सुख
हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
कळाले सापडल्यानंतर!
तेच होते ते जरी
ते न राहिले तसे तरी
हवे होते ते तसेच तेव्हा
कळाले सापडल्यानंतर!
भाव पुसा बाजाराला
दाम जरी ना लाविला
अनमोल ते आहे खरे
कळाले सापडल्यानंतर!
शब्दांचा ना लागे ठाव
जरी दोन अक्षरांचा गाव
'सुख' म्हणती सारे त्याला
कळाले सापडल्यानंतर!
- संदीप चांदणे (13/4/14)
Sunday, April 13, 2014
वाट पाहणारा बाबा
येशील तू, पाहशील तू
गाली खुदकन हसशील तू
वाट पाहत्या या डोळ्यांना
थेंब मोत्याचे देशील तू!
मुठीहून मोठी खेळणी
दारावरचे झुलते माकड
कितीतरी हसून-नाचून
पुन्हा-पुन्हा धरशील तू!
न कळो तुला आतुरता
न दिसो तुला भावुकता
गालावरती गोड पापी
पहिल्यासारखीच ठेवशील तू!
ना ओठी बाबा तुझ्या
ना कुठली हाक अजून
कुणासही न कळणारे
बोल चिमखडे ऐकवशील तू!
तुझ्या आठवणीने व्याकूळ
क्षणाक्षणाला आधिक हळवा
कसा दिसतो बाबा तुझा
येशील तू, पाहशील तू!
- संदीप चांदणे (13/4/14)
Monday, April 7, 2014
गोष्ट ही हळहळलेली!
त्याच्या स्वप्नांची ढलपी
खुशाल त्यांनी जाळलेली
त्यानेही विस्तव होउन
आग उरात पाळलेली
मागून काहीच न मिळाले
न मागता दु:खे मिळालेली
त्यानेही करून साज ती
स्वत:वर अलगद माळलेली
ना कथा, ना काव्य कुठले
शब्दांनीही जागा गाळलेली
त्यानेही भिरकावली वा-यावर
गोष्ट ही हळहळलेली!
- संदीप चांदणे (7/4/14)
Thursday, February 27, 2014
सफर
किस कदर चोटी, चढके है आये!
लुभाती वादियां मिली राहोमें
उनसेभी कर किनारा है आये!
जाना हमने ना रूकता कोई
हम भी कभी, ना थमके है आये!
- संदीप चांदणे (27/02/14)
Monday, February 10, 2014
परतीचा प्रवास
आता नाही चालवत
आणि नाही सोसवत
एकेक गडी पडे, मनाला तडे
नाही देवा पाहवत
उघडयावर माझी प्रजा
उघडयावर त्यांचा राजा
कशी व्हावी भेट, कुठे दिसावी वाट,
कुठल्या कर्माची हि सजा
साद उध्वस्त मंदिरांची
हंबरत्या गायी-वासरांची
कानी ऎकू येते, कल्पनाही छळते
लुटत्या अब्रूच्या खेळांची
जीव ओवाळतो मातीवर
मराठी ह्या रक्तावर
दर्या आटवीन, नभही झुकवीन
सांगतो हे शपथेवर
वाकणार नाही कणा
हा मराठ्यांचा बाणा
आशीर्वाद मागतो, तू सारे जाणतो
आयुष्य वाहिले समरांगणा
Sunday, February 2, 2014
पर्वतारोहण
काळा कातळ सह्याद्रीचा
जबरी त्याची धार
शूर सहांनी हसूनी केला
सारा पर्वत पार!
वारा गर्जे कड्यामधुनी
वर गारठ्याचा मार
शूर सहांनी हसूनी सोसला
काळोखाचाही भार!
नसलेल्या वाटा तुडवून
सोडला पाउलखुणांचा सार
शूर सहांनी हसूनी कोरला
इतिहासात तो वार!
- संदीप चांदणे (1/2/2014)
नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम
किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...
-
अकबर बिरबल (मोत्यांची शेती) -------------------------------------------------------------------------------------------------------------...
-
Not everyone will follow you But, you keep walking... towards your goal Not everyone will listen to you But, you keep talking... until you y...
-
तुझी याद येते आज इथे तू नसताना काही आठवून हसताना तू नाहीस हे उमजल्यावर तुझी याद येते! वर्षे सरली, लोटला काळ पण, जणू गोष्ट कालचीच...