Saturday, December 28, 2013

केस मी कापले

भार हलका डोक्याचा
शांत वाटू लागले
आईही हसली जेव्हा
केस मी कापले!

बाबांना तर हर्षवायू
तेही गाउ लागले
मान त्यांचा राखला
केस मी कापले!

ओळखेनात मित्र मला
संशयाने पाहू लागले
फेक पोरीची मारून
केस मी कापले!

पटविण्या खात्री, शाळेने
चाचपून डोके पाहिले
सांगून थकलो जरी
केस मी कापले!

कुणी म्हणे हा देवभक्त
जाउन देवाला वाहिले
अजाण राहूनी कसे
केस मी कापले!

- संदीप चांदणे (28/12/13)

बॉम्बस्फोट आणि शहर

तरतरीत सकाळ
चकचकीत शहराची
नेहमीची गजबज
सरावल्या गर्दीची

लख्ख उजेडात
दिपला गोळा
अनुभवला दुर्मिळ
स्फोटाचा सोहळा

रूपेरी ढगांना
किनार अंधारी
कोंदू पाहते
जमीन सारी

कायापालट तिथे
झालेला असा
मघाचा रस्ताही
दिसेना कसा?

भोवताली कोण?
बोलेना कोण!
बोलले कोण?
ऐकेना कोण!

कामाचे हात
कायमचे निवांत
कोवळ्या स्वप्नांची
नजर नभात

रूग्णवाहिकांचे
ध्वनिक्षेपकांचे
मिसळले आवाज
जिवंत शरीरांचे

आकांत आक्रोश
बडवून छाती
अनवाणी मनाची
क्षणात माती

सरकारी गणवेश
सांडले मागून
शांतीचे सर्वांना
करती आवाहन

दुपार होता
स्थिरावले सारे
संध्याकाळी नेहमीचे
झोंबले वारे!


- संदीप चांदणे (28/12/13)

Sunday, December 22, 2013

मिळेल का?

एकच गाणे ओठांवर हे
मनास वाटे, कुणी ऐकावे
गाण्यात या हरवणारी
जोडी 'डूलांची' मिळेल का

रात्र थोडी सोंगे फार
अपेक्षांचा सलतो भार
खेळ आजचा पूर्ण कराया
वेळ 'उद्याचा' मिळेल का?

खुणावती पुन्हा त्या वाटा
आठवणींच्या कधी स्वप्नांच्या
सोबत मजला छान मजेची
त्या 'पायांची' मिळेल का?

वाटे मजला होउनी जावे
क्षणात हे अन क्षणात ते
अद्भुत, गूढ गुहेत कुठल्या
तो 'दिवा-जादूचा' मिळेल का?

उतरून खाली कल्पनेतून
मागतो मी डोळे उघडून
ओंजळीत सा-या पसाभर
दान 'सुखाचे' मिळेल का?

- संदीप चांदणे

Friday, September 20, 2013

मुग्धा

उपमा विशेषण तुला पुरेना
नाव साजीरे ओठी ठरेना
कसे सुटावे क्लिष्ट कोडे
आई-बाबा, आजी-आजोबांनाही कळेना!
 
लखलख चमचम नभांगणातील | नक्षत्राचा तारा तू |
माणिक-मोती, नीलम पाचू | अव्वल रत्ना हिरा तू ||
 
तू परी तू मंदाकिनी | निलाक्षी सुनयना तू |
तू पल्लवी तू गोजिरी | सुहासिनी सुवदना तू ||
 
सकवार सोनाली तू | हळुवार हसरी स्मिता तू |
तू रूपाली तू रातराणी | सुमना तू प्राजक्ता तू ||
 
तू मधुरा तू काव्या | ओवी तू कादंबरी तू |
तू अक्षरा तू सुवर्णा | चित्रा तू किमया तू ||
 
तू  वीणा तू वृंदा | विद्या तू विनया तू |
तू वंदना तू वज्रा | विरता तू विजया तू ||
 
तू योगिनी तू तेजस्विनी | कमला तू सीता तू |
तू राधा तू मीरा | तृप्ती तू, गीता तू ||
 
यज्ञा तू, गौरी-मंगला | दिव्या तू  मानसी तू |
भैरवी-भूपाळी अन | स्वरा तू रागिनी तू ||
 
मेघा, वर्षा, नीरा तू | सरिता तू गंगा तू |
तू आर्या तू अवनी | संस्कृती, संयोगिता तू ||
 
तू श्वेतप्रभा तू पूर्वा | श्यामल वर्णा संध्या तू |
मोहक-मयुरी मुक्ता तू | संमोहिनी "मुग्धा" तू! ||
 
- संदीप चांदणे
z                (20/09/13)

Sunday, September 15, 2013

कागद आणि लेखणी

कागद आणि लेखणी

बसलो आहे...
एक कागद घेऊन
आणि लेखणी...
पाहू या...
काय उमट्तय!
हळुवार गंधीत प्रेमकविता... की?
नुसताच आठवणींचा पसारा...
जो आवरता आवरता मीच त्या
पसा-याचा भाग होऊन
हरवून जाईन!

का उमटेल कुठली
व्यथा, वेदना,
आक्रोश...
ऐकू येणारा, समजणारा
पण...
कुठून येतोय हे
नक्की न कळणारा!

का या जाचक, मुखवटाधारी
समाजावर, रूढींवर
आग ओकतील शब्द
त्यांचं नाकर्तेपण...
दुट्प्पीपणा...
पैसा, प्रसिद्धीमागे
पळण्याची अंगी भिनलेली सहजव्रुत्ती...
...यांवर लिहीता लिहीता
शब्दांशब्दांत, अक्षराअक्षरांत
अचानक डोळ्यांत खुपणारा
डोळे मिटायला लावणारा...
आरसा... ... किंवा
त्याचे असंख्य तुकडे
दिसतील, बहुधा...!(नकोच मग ते!)

एखादे छान, छोटेसे
चित्रही चालेल
रेखाचित्र, वस्तु-स्थिरचित्र
प्रतीमांचा, प्रतीकांचा
गूढ पण आनंद देणारा
वावर... ... वापर...
कुणी डोळे विस्फारावे
कुणी फेंदरे नाक मोडावे
कुणी ह्रदयाशी धरावे!

का, मलाही बुचकळ्यात
टाकणारं...
स्वत:चा स्वत:वर
विश्वास न बसू देणारं
मनाच्या कुठल्याच
कोप-यात नसलेलं
पण, अरेच्चा...!
हे आधी का नाही
सुचलं...??!!
असं म्हणायला लावणारं!

खरंच सांगतो...
हा कागद आणि लेखणी
अक्षरश: कामाला लावतात मला
आणि खोदून काढतात...
मलाच...!
              - संदीप चांदणे
               (15/09/13)

संदीपायन

पाय-या बापुड्या | काय त्यांसी ठावे |
चढावे - उतरावे | ज्याचे त्याने ||

गळा भेटोनि | द्यावा अंगदेश |
ऐसा तुझा वेश | नाही गड्या ||

माहित असता | कुठे जायाचे |
मग चुकायाचे | काय कारण? ||

आपुले कार्य | आपण करिती |
पहा सभोवती | प्राणी - पक्षी ||

म्हणे संदीप | अमर ना कोणी |
तरी संसारी अजूनी | पापव्रुद्धी ||

                  - संदीप चांदणे
                  (15/09/13)

संदीपायन

शहाणे वागता | मिळे समाधान |
होइ नुकसान | मूर्खाचेच ||

देखोनि बैसला | परी न बोलला |
रागे धरियेला | कशापायी ||

आजचा व्रुत्तांत | फुका चघळिला |
नाही मिळविला | कण अकलेचा ||

कधी शिकणार | ध्यानी धरणार |
कोण तारणार | वेड्या तुला ||

म्हणे संदीप | बुडली नौका |
मारी जो हाका | पाहोनि छिद्र ||

                      - संदीप चांदणे
                       (14/09/13)

Tuesday, June 11, 2013

महाराष्ट्र माझा!

महाराष्ट्र माझा!


जमले ना अजूनी इतके
शब्द पुरे कोशात
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

पाय धुतो अरब सागर
पाठी द्ख्खनचे पठार
वरून पाहते कळसूबाई
गड-किल्ल्यांचा पसारा फार
          भूमी  पावन शिवप्रभूंची
          स्फूर्ती भरते उरात ।।१।।
          परिचय देण्या महाराष्ट्राचा
          लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

घोर गर्जे खडा सह्याद्री
थाप डफावर शाहिरांच्या
देखणी लावणी इथली
कणाकणात खुणा संस्कृतीच्या
          पूर्वेला तांबडे फुटते
          वासुदेवाचे गाणे गात ।।२।।
          परिचय देण्या महाराष्ट्राचा
          लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

अष्टविनायक ठाणी कुणी
अशी दुसरी न पाहीली
शिवशंभो ठायी वसला
आदिशक्ती इथेच रमली
          गजर विठूनामाचा करीत
          वारी येते पंढरपुरात ।।३।।
          परिचय देण्या महाराष्ट्राचा
          लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

वर्णन पुराणात सापडे
इतिहास इथे नत झाला
पर्णकुटी ती रामाची
वनवास पांडवांचा पाहिला
          शांतीचे सांगुन मोल
          पहुडला सिद्धार्थ लेण्यात ।।४।।
          परिचय देण्या महाराष्ट्राचा
          लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

अमृताते पैज जिंकली
ज्ञानेशाच्या ओवीसंगे
झाला श्रोतावर्ग वेडा
नाथाच्या भारूडामागे
          जिवंतपणीच इथला तुका
          गेला गरुडावरून वैकुंठात ।।५।।
          परिचय देण्या महाराष्ट्राचा
          लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

पठ्ठे बापूरावांच्या शाहीरीत
गदिमांच्या गीत-रामायणात
केशवसुत, कुसुमाग्रज आणि
अत्रे, पुलंच्या लेखनात
          हरवला हर एक जीव
          बहिणाबाईच्या अहिराणीत ।।६।।
          परिचय देण्या महाराष्ट्राचा
          लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

औरंगजेब पुरा हैराण
सारी हयात नाही पुरली
ज्योत क्रांतीची धगधगली
धडकी इंग्रजांना भरली
         टिळ्कयुग पाहिले साऱ्यांनी
         गुरू गांधीचा या भूमीत ।।७।।
         परिचय देण्या महाराष्ट्राचा
         लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

सीमेवर खडा पहारा
देई फौजी जिल्हा सातारा
देशाचे पाऊल पहिले
पडते शहरी नागपुरा
          देऊन गेली एक उल्का
          लवण सरोवर बुलढाण्यात ।।८।।
          परिचय देण्या महाराष्ट्राचा
          लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

देव खेळला इथे येऊन
गायली साक्षात सरस्वती
अवलिया इथलाच एक
गेला पेटवून दृकचित्रज्योति
        गणती महापुरुषांना नाही
        अशी भारतरत्ने या राज्यात ।।९।।
        परिचय देण्या महाराष्ट्राचा
        लागतील घ्यावे जन्म सात ।।धृ।।

                               - संदीप भानुदास चांदणे

Thursday, March 28, 2013

सरोवर

चांदराती दुधाळ
किरणे मधाळ
धुंद गाणे
वारा गुणगुणे
विसरूनी वाट
थिजली पहाट
प्रतिबिंब सारे
पाहती तारे
प्रितीचा बहर
दिसे पाण्यावर
सरोवर लाजले
कमळांखाली लपले!

Monday, February 18, 2013

लालपरी

ती आहे लालपरी, खरीखुरी
मी जमिनीवर, ती अंबरी
मी शोधतो तिला एकांतात
पापण्यांच्या आत, खोल स्वप्नात
तिथेही ती येत नाही
मी अंथरले जरी हृदय माझे
ती त्यावरही उतरत नाही

ऐकू येतात फिरून
ह्या उंच क्षितिजावरून
मी फेकलेले सूर
जातात जरी दूर
ती कधीच ऐकत नाही
मी देऊ पाहतो गीत
ती स्वत: मागत नाही

मी पाहतो वर, होऊनी मोर
कधी चांदण्यांचा चकोर
वर्षाव संपून जातो
मी तसाच कोरडा राहतो
प्रतीक्षा संपत नाही
मी तुडविली युगे किती
ती कुठेच सापडत नाही

हे कुणी मला सांगावे
मी आणि काय करावे?
जो देतो बांधूनी गाठ
कशी व्हावी त्याच्याशी भेट?
हे गूढ उकलत नाही
मी पाहिले किती पुसून
ती रेषाच ललाटी नाही

मी कशी सोडू अर्ध्यावर?
प्रीत माझी वाऱ्यावर
मी पीन हलाहल प्याला
जीवन नाव ज्याला
मग कंठदाह रोखाया
ती निघेल धरेवर याया
मी तिला ये म्हणणार नाही
झाला जरी उशीर किती
मी तोवर मरणार नाही!

- संदीप चांदणे

Monday, February 4, 2013

लावण्य खाण

हलके धरून
            खट्याळ लडिवाळ,
            बट कुरवाळ
                              वाऱ्यावर लहराया!

डचमळे कसा
            ओठ काठ,
            मदिरेचा थाट
                              बेहोष कराया!

तंग तोकडी
            चोळी निळी,
            तुझी भोळी
                              लपविते काया!

भासे मज
            लावण्य खाण,
            तू जाण
                              अस्मानी सौंदर्या!

काव्य माझे
            घडते अवघडते
            अपुरे पडते
                              तुला वर्णाया!

- संदीप चांदणे

Friday, January 25, 2013

डोळे

एवढे ग कसे तुझे
पाणीदार डोळे?
करतात खोड्या
आणि दिसतात भोळे!

वाटेवर परवा माझ्या
झाले होते ओले
जवळ तुला घेताच
दार लावून गेले!

इशारे सारे
शिकून आलेत कुठून?
काही न बोलताच
सारे जातात सांगून!

पापण्याही डोळ्यांच्या
खेळांमध्ये सामील
किती घायाळ होती
माझ्यासारखे गाफील

ओठांनी आता
बोलू नये वाटते
एवढी तुझ्या डोळ्यांची
भाषा मला कळते!

माझ्या बाळाची आई

घालीन जिच्या मी ओटी
माणिक-मोती कित्येक कोटी
दुसरी कुणीही नाही
ती, माझ्या बाळाची आई

स्मरू त्या घडीस सदा
दिली जिने ही चाहूल
आम्ही जाऊ स्वप्नांच्या गावा
जिथे चालेल बोबडे पाऊल
रास होईल सुखांची
आणि सागर आनंदाचा
वात्सल्यमूर्ती होई
माझ्या बाळाची आई

गोकूळ घराचे होईल
बाळ नंदाचा येईल
पडता कानी स्वर पहिला
हर्ष आम्हांस होईल
पिल्लू आम्हां पाखरांचे
पाडस होईल हरणाचे
अन वासराची गोमाई
माझ्या बाळाची आई

मग धावू आम्ही दोघे
चिमण्या बाळाच्या पाठी
लडिवाळ-मंजुळ हाका
असतील आमुच्या ओठी
थकून ते जेव्हा
कुशीत विसावून जाईल
गाईन प्रेमळ अंगाई
माझ्या बाळाची आई

Thursday, January 24, 2013

एक उदास संध्याकाळ

कुठली अनामिक ओढ ही
रेंगाळणाऱ्या सांजेला
दूर क्षितीजी पिवळी गुणगुण
हुरहुर लावी मनाला

शहारत्या पाठी कुरणांच्या
तिरप्या नजरा रविकिरणांच्या
शब्द न पुरवी गीताला
तळ्यातल्या रांगा बदकांच्या

दुर्लक्षित थवे पक्ष्यांचे
अन किणकिण घंटा गायींच्या
उलगडता न उलगडणाऱ्या
घड्या हाता-पायांच्या

माळावरची जलद सावली
नकळे भरभर कुठे चालली
अकस्मात ही निसर्गचित्रे
पापण्यांच्या कडांत बुडाली

Wednesday, January 23, 2013

प्राजक्तफुला

तिचे तिमिरी केस लहरता
चहु दरवळ अत्तराचा
तिला लपविण्या मदती माझ्या
सडा प्राजक्तफुलांचा

फुले वेचुनी परड्या भरता
नाजूक तिच्या बोटांनी
अगणित ती सुवासिक स्मरणे
मी, भरू कुठल्या कुप्यांनी?

भेट एकांती सजविण्या
ये पुन्हा-पुन्हा बहरूनी 
धवल-केशरी गालीचा तू
ठेव तिथे पसरूनी

तव गंधासवे कवितांचा
माझ्या, व्हावा स्वैर झुला
दे एवढाच मजला सुगंध
तू, उसणा प्राजक्तफुला

- संदीप चांदणे (९/११/२०१२)

Friday, January 4, 2013

एक तळे

एक तळे
निळे निळे
माशांना साऱ्या
घेऊन लोळे

दाट झाडी
गर्दी झुडूपांची
पाऊलवाट
गावाबाहेरची
तळ्याकडेच
मुरडत वळे

कोळ्याची होडी
वल्हे होडीचे
बगळ्याची समाधी
सूर बदकांचे
खेकड्यांची बिळे
इथेच मिळे

सकाळी झळाळे
शहारे सांजेला
नक्षी तरंगाच्या
मिळती काठाला
दिवसभर खुळे
स्वतःशीच खेळे
एक तळे
निळे निळे

- संदीप भानुदास चांदणे

एकांत

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?

चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना
बळेच एकत्र मांडावं
नेमकं त्याच कडव्यावर
का मनानं सांडावं?

आजच्या बंडखोर लेखकानं
कालच्याला भांडावं!
दोघांचही चुकत नसतं
कुणाला समोर ठेवावं?

तिन्हीसांजेची वेळ समोर
अन एकांतानं घेरावं
कितीही नको म्हटलं तरी
का आठवणींनी आठवावं?

शीळ  येते मुक्कामी
शब्दांनी का रुसावं?
सुस्कारे नि हुंकार याला
गुणगुणनं कसं म्हणावं

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?

स्वच्छंदी

डोळ्यात तू, श्वासांत तू
गंध तुझाच सुगंधी

बाहूत तू, मनात तू
चेहरा तुझाच धुंदी

शब्दांत तू, गीतात तू
तुझाच मी छंदी

अबोल मी, अजाण मी
पाखरापरी तू स्वच्छंदी

Thursday, January 3, 2013

फुलाचे मनोगत

फूल झालेल्या कळीस एका
विचारले मी नवलाईने
किंचित लाजून, थोडी हसून
बोलली ती मग धिटाईने

पुसले त्या सुकुमार पुष्पा
फुलले कसे सुगंधी यौवन?
जादू घडली रात्रीत कशी,
कुणी घातले तुज संमोहन?

सांगे मज ती कळी कालची
वाऱ्यावरती कितीक डोलून
भ्रमर, प्रियकर, फुलांचा येईल
गेल्या वातलहरी कानी सांगून

ताटव्यातल्या फुलांपरी मी
मधमाशांसवे जाईन रमून
मागून घेईन गुणगुण गाणी
आणि मधुरस देईन वाटून

स्त्रीच्या शृंगारसाधने दिली
जरी सौभाग्यलेणी ठरवून
मीही सजवीन वेणी होऊन
तयां केशीचे रूप अजून

रे खराखुरा मी होईन धन्य
दे पायदळी मज तू त्यांच्या
कष्टी कुणा भवताली पाहून
ढवळून उरात येई ज्यांच्या

- संदीप भानुदास चांदणे 

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...